अमरावती : अचलपुरात तणावानंतर संचारबंदी; पोलीसांचा तगडा बंदोबस्त | पुढारी

अमरावती : अचलपुरात तणावानंतर संचारबंदी; पोलीसांचा तगडा बंदोबस्त

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अचलपूर शहरातील बिलनपुरा येथील दुल्हागेटवर झेंडा लावण्याचा वादातून रविवारी (दि.17) दोन समुदायातील नागरिकांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दगडफेकीत दोन्ही गटातील नागरिकांसह पोलिस कर्मचारी ही जखमी झाले. तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांनी तीन अश्रूधुराचे नळकांडे फोडले. दंगलखोरांना पांगविण्यासाठी लाठ्यांचा धाक दाखवावा लागला. त्यानंतर तणाव शांत करण्यात पोलिसांना यश मिळाले.

पोलिसांनी अचलपूर शहरात मोठा बंदोबस्त लावून असून, सोमवारी अचलपूर शहरात शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेच्या अनुषंगाने अचलपूर पोलिसांनी तीन गुन्हे नोंदवून जवळपास 25 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अचलपूर-परतवाडा शहरात रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे विविध कार्यक्रम शांततेत पार पडले. रविवार (दि.17) रात्री अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुल्हागेट परिसरात भाजपा पदाधिकारी अभय माथने यांच्यासह 4 ते 5 नागरिकांनी भाजपाचा झेंडा लावला. हा झेंडा लावण्यास विशेष समुदायातील नागरिकांनी विरोध केल्यानंतर हा वाद उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केली. या घटनेची माहिती मिळताच अचलपूर पोलिस घटनास्थळ दाखल झाले. दरम्यान, दगडफेकीत पोलिस कर्मचार्यांसह दोन्ही समुदायातील नागरिक जखमी झाले. तणावाची स्थिती पाहून तत्काळ अचलपूरात अतिरिक्त पोलिस कुमक दाखल झाली. पोलिसांनी अचलपूरात तगडा बंदोबस्त लावल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

अचलपूरात कर्फ्यू

ग्रामीण पोलिस दलाने अचलपुरातील तणावाची स्थिती पाहता तत्काळ रविवारी रात्रीच अचलपूर उपविभागीय अधिकारी यांनी कलम 144 अन्वये संचारबंदी घोषित केली. शहरातील चौकाचौकात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून नागरिकांना बाहेर न येण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी दंगलखोरांवर कारवाई करीत तीन गुन्हे दाखल केले. यामध्ये 22 ते 25 आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहे.

अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून गर्दी पांगविली

बिलनपुरा परिसरात रात्री 9 वाजताच्या सुमारास झेंडा लावण्यावरुन वाद झाल्यानंतर दोन समुदयात हाणामारी व दगडफेक सुरु झाली. या घटनेच्या माहितीवरून अचलपूर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काही क्षणात 1 ते 2 हजार नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर दोन्ही समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक व हाणामारी सुरु झाली. त्यामुळे पोलिसांना तत्काळ अतिरिक्त पोलिस कुमक बोलवावी लागली. पोलिसांनी या तणावाच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. घटनेनंतर झेंडा चौकात विटा व दगडांचा खच पडला होता. या दगडफेकीत काही युवकांसह पोलिसही जखमी झाले. दंगलखोरांनी रस्त्यावरील ऑटो व कारची तोडफोड केली.

पोलिसांचा ताफा अचलपुरात

तणावग्रस्त स्थिती पाहता अमरावती, अकोला जिल्ह्यासह अचलपुरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जवळपास 650 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना यांच्या नेत्तृत्वात प्रभारी पोलिस अधीक्षक शशिकांत सातव हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरीता रात्रीपासून अचलपूरात शहरातच दाखल झाले आहे. अकोला येथील 100 अधिकारी व कर्मचारी, एसआरपीएफच्या 3 प्लाटून, अमरावती जिल्ह्यातील 22 अधिकारी व 90 कर्मचारी, एक दंगा नियंत्रण पथक शहरात तैनात आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांना अडविले

भाजप जिल्हा पदाधिकार्यांनी अचलपूर शहरात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना जाण्यास मनाई करून त्यांना आसेगाव पोलिस ठाण्यात थांबवून ठेवले आहे. भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व अन्य पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. त्यांना नंतर सोडण्यात आले.

शहरातील झेंडे काढण्याची प्रक्रिया सुरु

अचलपूर -परतवाडा शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध रंगाचे झेंडे काढण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. नगर परिषद व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहरातील विविध धर्माचे, पक्षाचे झेंडे व बॅनर जप्त केले आहे.

शाळकरी विद्यार्थी परतले घरी

अचलपूर शहरात रात्री झालेल्या घटनेची माहिती बहुतांश नागरिकांना नसल्याने अनेक विद्यार्थी सोमवारी सकाळी शाळेत गेले. मात्र, त्यांना शिक्षकांनी परत पाठविले. त्यामुळे अनेक पालकांची धावपळ झाली. सोमवारी बाजारपेठ व शासकिय कार्यालय पूर्णत: बंद होते.

जातीय सलोखा कायम राखावा

अचलपूरात जातीय सलोखा कायम रहावा, यासाठी खासदार नवनीत राणा मंगळवार, (दि.19) अचलपूर जाणार आहे. खासदार नवनीत रवी राणा पोलिस ठाण्याला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून जातीय सलोखा व सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी खासदार नवनीत राणा प्रयत्न करनार आहे.

सर्वांना शांततेचे आवाहन करण्यासाठी खासदार राणा संवेदनशील भागाचा दौरा करणार आहे. या घटनेस जबाबदार असणार्या दोषींवर कडक कार्यवाही करा, पण निरपराध नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणि निर्दोष नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश खासदार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. नागरिकांनी संयम राखावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन खासदार राणा यांनी केले आहे.

अफवा पसरवणा-यांवर कारवाई

कायदा तोडणा-र्यांची कोणतेही गय केल्या जाणार नाही. अफवापासुन सावध रहा. अचलपूर शहरात दोन समाजामध्ये झालेला वादावर पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळविले आहे. पोलिसांना शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करा.
चंद्रकिशोर मिना, विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती

संचारबंदीचे पालन करा, घराबाहेर पडू नका

तनाव सदृष्य घटनेच्या अनुषंगाने जुळ्या शहरासह नजीकच्या ग्रामपंचायत परिक्षेत्रात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी घराच्या बाहेर पडु नये. कायद्याचे पालन करावे, घटनेच्या स्थितीला अनुसरुन संचारबंदी शिथील करण्यात येईल.
संदीपकुमार अपार, एसडीओ, अचलपूर

Back to top button