बुलडाणा : प्रेमीयुगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या | पुढारी

बुलडाणा : प्रेमीयुगुलाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी गोसिंग (ता. नांदूरा) शिवारात उघडकीस आली. मृतांमध्ये शेख अल्ताफ शेख शकील (२२, रा. गोसिंग ता. नांदूरा) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.

या घटनेबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गोसिंग येथील शेख अल्ताफ हा तरुण सोमवारी (दि. २१) दुपारी बक-यांना चारा आणण्यासाठी दुचाकीने शेताकडे गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घराकडे परतला नाही. त्याची दुचाकी शेताच्या बांधावर आढळून आल्याने त्याच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रात्री उशिरा पोलीसांत दिली. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता गोसिंग गावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी एका विहिरीच्या काठावर दोन मोबाईल्स व बेपत्ता अल्ताफचा चष्मा दिसून आला. याबाबतची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने विहीरीच्या पाण्यात शोध घेतला असता बेपत्ता अल्ताफच्या मृतादेहासोबत एका १७ वर्षीय मुलीचाही मृतदेह आढळून आला. ही मुलगी मोताळा तालुक्यातील तरोडानाथ येथील असल्याची माहिती समोर आली.

मृत मुलीचे वडील जालना येथे गेले होते. ती गावात आजी सोबत रहात होती. सोमवारी दुपारपासून मुलगी बेपत्ता झाली असल्याचे तीच्या आजीने कळवल्याने तीचे वडिल रात्रीच गावी आले होते. अल्ताफ नावाच्या तरुणाचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्यानेच वैशालीला पळवून नेले असावे अशी शंका बळावल्याने आज (दि. २२) मंगळवारी सकाळी ते मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन पिंपळगावराजा पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी अल्ताफविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

त्याचवेळी गोसिंग शिवारातील विहिरीत अल्ताफ आणि एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची बातमी समजली. दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा अधिक तपास बोराखेडीचे ठाणेदार राजेंद्र पाटील, उपनिरिक्षक अशोक रोकडे करीत आहेत.

Back to top button