यवतमाळ : २३ मार्चला रोखपाल गणपत आसुटकर यांच्या जामीनावर होणार सुनावणी   | पुढारी

यवतमाळ : २३ मार्चला रोखपाल गणपत आसुटकर यांच्या जामीनावर होणार सुनावणी  

घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील (यवतमाळ) कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर यांनी बँकेत अपहार केल्याच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज यवतमाळचे न्यायाधिश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी फेटाळला होता. दरम्यान, आरोपी गणपत आसुटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्याची सुणावणी २३ मार्च रोजी होणार आहे. आरोपीतर्फे वकील अनिल धवस हे काम पाहत आहे. तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड. व्हि. ए. ठाकरे बाजू मांडणार आहे.

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत फिर्यादी गिरजा श्रीकृष्ण आडे हिने सन २०२० रोजी बचत खाते उघडले होते. या खात्यात शेतातील पिकाची रक्कम खातेदार वेळोवेळी टाकत असे. फिर्यादी गिरजा आडे हिने १४ मे २०२० रोजी ४९ हजार ९९९ रुपये व १६ जुलै २०२० रोजी ५० हजार रुपये बँकेत जमा केले होते. फिर्यादीच्या मुलीचे लग्न असल्याने तिने पैसे विड्राॅल करण्यासाठी ३ जानेवारी २०२२ रोजी बँकेत गेली होती. मात्र, नव्याने रुजू झालेले रोखपाल राजु राजुरकर यांनी खात्याची पाहणी केली असता बचत खात्यात ५० हजार रुपये कमी असल्याचे खातेदारास सांगितले. त्यामुळे तिला धक्का बसला.

बँकेत रक्कम जमा करते वेळेस गणपत आसुटकर हे बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत होते. तसेच कुर्ली येथील पांडुरंग मडावी यांचे ५० हजार रुपये सुद्धा बँकेत जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांचीही फसवणुक झाली. या प्रकरणाची लेखी तक्रार गिरजा श्रीकृष्ण आडे हिने पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या वरुन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी आरोपी रोखपाल गणपत आसुटकर विरुद्ध भादंवि कलम ४०९, ३४ संगणमत करुन अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला होता.

पारवा पोलीस आरोपी यांस अटक करण्यासाठी त्याच्या मुळ गांवी वणी येथे अनेकदा गेले असता आरोपी हा घरी आढळुन आला नसून तो फरार असल्याचे समजते. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण करीत आहे. आरोपी गणपत आसुटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज (एबीए) क्रमांक १६४/२०२२ दाखल केला आहे. सदर प्रकरणाची सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.

Back to top button