कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या पुरस्काराला ‘अर्थ’पूर्ण घडामोडीची झालर! | पुढारी

कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या पुरस्काराला ‘अर्थ’पूर्ण घडामोडीची झालर!

कोल्हापूर ; विकास कांबळे : दबा धरून बसणार्‍या, सतत ‘रामकृष्ण हरी’चा जप करणार्‍या परंतु प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधणार्‍या एका ‘योगीराज’ने राजर्षी शाहूरायांच्या नावाने देण्यात येणार्‍या पुरस्कारामध्ये देखील ‘घोळ’ घातल्याने पुरस्कारच काळवंडला आहे. पुरस्कार समारंभाच्या पूर्वसंध्येला ऐनवेळी मर्जीतल्या कर्मचार्‍यांची नावे घुसडून खिरापत वाटल्याप्रमाणे पुरस्कार दिल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराचा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा परिषद सदस्यांना तसेच चांगले काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने 2007-08 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार सुरू करण्यात आला. सुरुवातीला काही वर्षे या पुरस्काराचे पावित्र्य राखण्यात आले. परंतु नंतर मात्र कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या पुरस्काराचा ‘बाजार’ कमी-अधिक प्रमाणात जिल्हा परिषदेतील बहुतांशी विभागात सुरू झाला. सर्व विभागांना न्याय देण्यासाठी पुरस्काराची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य प्रशासन व आरोग्य विभागाला प्रत्येकी पाच, राहिलेल्या बांधकाम, पशुसंवर्धन, कृषी, वित्त व शिक्षण विभागातील प्रत्येकी एका कर्मचार्‍याची निवड करण्यात येते.

कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. ही प्रमाणपत्रे अधिकार्‍यांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिली आहेत. हीच प्रमाणपत्रे समारंभात अधिकार्‍यांना पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आल्याने प्रमाणपत्र पाहून डोक्याला हात लावण्याची वेळ आली. यादीतील नावांचे गुणांकन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी तपासले. यामध्ये एका कर्मचार्‍याला जाणीवपूर्वक कमी गुण दिल्याचे आढळून आले. त्यामुळे जास्त गुण असलेल्या कर्मचार्‍याचे नाव यादीत घेण्याच्या सूचना दिल्या. परंतु आरोग्य विभागातील या बहाद्दराने दोन्ही नावे पुरस्काराच्या यादीत घुसडली.

पूर्वी पुरस्कार जाहीर झालेल्या कर्मचार्‍यांची नावे

सविता पालकर, प्राची बोटे, अभय नाईक, महेश देशमुख, वैशाली जाधव

‘घडामोडी’नंतर निश्चित करण्यात आलेली नावे

प्राची बोटे, शरद पवार, महेशकुमार देशमुख, प्रशांत लाड, सविता पालकर, बळवंत पवार, अभय नाईक

Back to top button