ठाणे : घोडबंदर रोडवर ट्रेलर उलटला ; वाहनांच्या लाबं रांगा | पुढारी

ठाणे : घोडबंदर रोडवर ट्रेलर उलटला ; वाहनांच्या लाबं रांगा

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा :

ठाण्याकडे येणाऱ्या घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ ओव्हरटेक करणाऱ्या कारला वाचविताना ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातामुळे घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे मार्गिकेवर जवळपास दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी या मार्गिकेवरील वाहतूक कासवगतीने सुरू होती. या ट्रेलरमध्ये २५ टन कच्चा लूम मटेरियल होता.

तुषार चौरसिया यांच्या मालकीचा ट्रेलर घेऊन चालक तस्सुवर खान हा गुजरात, सुरत येथून न्हावा शेवा, नवी मुंबईकडे निघाला होता. तो ट्रेलर घोडबंदर रोडने ठाणे मार्गे नवी मुंबईत जात होता. यावेळी गायमुख जकात नाक्याजवळ आलेली एक कार त्या ट्रेलरला ओव्हरटेक करत असताना त्या कारला वाचविण्याचा नादात ट्रेलर उलटला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.

या अपघातातील ट्रेलर जवळजवळ रस्त्याच्या एका बाजूला जाऊन उलटला. ही घटना साधारणपणे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, कासारवडवली पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उलटलेला ट्रेलर क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आला. तसेच सांडलेल्या तेलावर माती पसरविण्यात आली.

ट्रेलर रस्त्याच्या एका बाजूला करेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा म्हणजे अंदाजे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेल्या होत्या. याच दरम्यान वाहतूक कासव गतीने सुरू होती. ट्रेलरला बाजूला केल्यावर साधारण साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचलं का? 

Back to top button