एस.आय.पी. कडे गुंतवणूकदारांचा वाढता कल - पुढारी

एस.आय.पी. कडे गुंतवणूकदारांचा वाढता कल

डॉ. वसंत पटवर्धन

गेला आठवडा नवरात्र, दसरा अशा शुभ दिवसांचाच होता. त्यामुळे शेअरबाजारातही उभारीच होती. निर्देशांकाने 61 हजारांची सीमा ओलांडली आहे आणि त्याचे पुढचे लक्ष्य आता 65 हजारांपर्यंत तर निफ्टी गेल्या गुरुवारी 18,300 च्या आसपास होता. तर त्याचे पुढचे लक्ष्य 20,000 आहे. म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्वास आता वाढतच चालला आहे. सप्टेंबरमध्ये प्रथमच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एस.आय.पी.) 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

याच काळात 26.8 लाख नवी एस.आय.पी. खाती उघडली गेली. हाही एक विक्रमच आहे. गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे कल वाढला आहे. कारण, समभाग त्यांच्या आटोक्याबाहेर जात आहेत आणि सोन्याच्या भावात खूपच उलथापालथ होत आहे. शिवाय दरमहाच्या पगारातून निश्चित अशी रक्कम बाजूला टाकणे नोकरदारांना शक्य होते. किरकोळ महागाईसुद्धा 4.35 टक्क्यांवर आली आहे.

टाटा समूहाने ‘एअर इंडिया’साठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे तांबड्या वेशातील महाराजा आता झुकून सतत नमस्कार करण्याचे चित्र बघायला मिळेल. मात्र, एअर इंडियाच्या चारही उपकंपन्या सरकार आपल्याकडेच ठेवणार आहे. ‘एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड’ ‘एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड’, ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड’ आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या एअर इंडियाच्या उपकंपन्या आहेत. त्या सरकार आपल्याकडेच ठेवणार आहे.

रिझर्व्ह बँकेने सेंट्रम समूह आणि भारत पे यांच्या गटाला लघुवित्त बँक (स्मॉल फायनान्स बँक) सुरू करण्याचा परवाना दिला आहे. सुरू करणार असलेल्या या बँकेचे नाव ‘युनिटी स्मॉल फायनान्स बँक’ असे राहील. पुढील काही आठवड्यांत तिचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल.

हक्काच्या घराचे आणि मोटारींचे स्वप्न पुरे करण्यासाठीची कर्जे आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या डिजिटल सेवेतून उपलब्ध होतील. त्यामुळे ग्राहकाला आपल्या सोयीच्या वेळेनुसार आणि सोयीच्या ठिकाणावरून व्यवहार करता येईल.

पुढील द्वैमासिक वित्तधोरणात रिझर्व्ह बँक अनेक कंपन्यांना कर्जरोख्यांची विक्री करायला परवानगी देईल. सुमारे 16000 कोटी रुपये खालील कंपन्यांकडून उभे केले जातील. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) आय. आर. एफ. सी., 2) एस. बी. आय. 3) पी. एन. बी. (पंजाब नॅशनल बँक) आणि इंडुसिंड बँक, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आय. आर. एफ. सी.) 5000 कोटी रुपये नजीकच्या भविष्यात गोळा करेल. त्यासाठी कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह वेतनाच्या माध्यमाचा उपयोग केला जाईल. पण त्यासाठीच्या खटपटींना अजून यश आलेले नाही.

जमिनीतील कोळशाच्या साठ्यावर काही मर्यादा असणारच आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज ही महाकाय कंपनी हरित ऊर्जा साठ्याच्या पाठीमागे लागणार आहे. त्यातील उत्पन्नामुळे रिलायन्स इंडस्ट्रीला दर तीन महिन्यांत शेअरमागे 150 ते 200 रुपये उत्पन्न मिळण्याची खात्री आहे.

सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा भाव 2700 रुपयांच्या आसपास आहे. रिलायन्सचे संस्थापक कै. धीरूभाई अंबानी यांनी कंपनीचे उज्ज्वल भविष्य 45/50 वर्षांपूर्वीच बघितले होते. ‘गुरू’ हा सिनेमा त्यांच्याच कर्तृत्वावर आधारलेला होता.
गुंतवणुकीसाठी सध्या अमर राजा बॅटरीज, गुजरात गॅस, टाटा पॉवर, टाटा मोटर्स योग्य वाटतात.

Back to top button