ठाणे : नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला मे महिन्याचा मुहूर्त | पुढारी

ठाणे : नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला मे महिन्याचा मुहूर्त

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबईतील १० जागांपैकी ८ जागांवर अभिनेते प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने विजय मिळवला आहे, तर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलच्या पदरात २ जागा पडल्या आहेत. नाट्य निर्माते दिलीप जाधव यांनी फेरमतमोजणीची केलेली मागणी मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कांबळी यांना विजयी घोषित केले आहे.

नाट्य परिषेदची नवी कार्यकारिणी १० मेनंतर जाहीर होणार आहे. नियामक मंडळाच्या ६० पैकी धुळे व जळगाव येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान प्रक्रियेत तसेच राजकीय हस्तक्षेपाच्या तक्रारी आल्याने हे दोन्ही निकाल राखून ठेवण्यात आले.

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या ६० जागांसाठी १६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. राज्यात सुमारे २८ हजारांहून अधिक मतदार असलेल्या परिषदेच्या निवडणुकीकडे निम्म्यांहून अधिक मतदारांनी पाठ फिरवल्याने अवघे ४० टक्केच मतदान झाले होते. या निवडणुकीत महामुंबईत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह तर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनल अशी सरळ लढत झाली होती. त्यात दामले यांच्या पॅनलमध्ये ८ जणांनी बाजी मारली तर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलमध्ये स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी – मोने विजयी झाल्या आहेत.

निर्माते दिलीप जाधव यांना ५६० तर कांबळी यांना ५६५ मते होती, अल्प मतांच्या फरकामुळे जाधव यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती, मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतल्याने प्रसाद कांबळी यांना विजयी घोषित करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले.

Back to top button