उद्धव ठाकरे रुग्णालयातून बाहेर पडताच 30 मिनिटांनी आनंद दिघेंचा मृत्यू ; मीनाक्षी शिंदे यांचा आरोप | पुढारी

उद्धव ठाकरे रुग्णालयातून बाहेर पडताच 30 मिनिटांनी आनंद दिघेंचा मृत्यू ; मीनाक्षी शिंदे यांचा आरोप

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  आनंद दिघे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना उद्धव ठाकरे हे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यानंतर 30 मिनिटांतच दिघे यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला. तसेच रोशनी शिंदेला ठाकरे भेटायला आले आणि तिला लगेच मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आल्याचे गूढ काय? मुख्यमंत्री कसे निष्क्रिय आहेत हे दाखविण्यासाठी रोशनी शिंदेचा नाहक बळी जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करीत शिंदे यांनी रोशनीला पोलिस संरक्षण देण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिंदे म्हणाल्या, आनंद दिघे रुग्णालयात असताना उद्धव ठाकरे त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेले होते. या दोघांत नेमके काय झाले, कसली चर्चा झाली, हे कुणालाच समजले नाही. परंतु उद्धव ठाकरे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांच्या आतच आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेलाही ठाकरे कुटुंबीय दिसले नाही. त्यामुळे आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत ठाणेकरांच्या मनात आजपर्यंत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. शिंदे यांनी रोशनीचा नाहक बळी जाण्याची भीतीही व्यक्त केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याने रोशनीला पोलिस संरक्षण द्यावे आणि मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल सर्जनचे पथक तयार करून तिच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.

Back to top button