ठाणे मनपा साहाय्यक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना अटक | पुढारी

ठाणे मनपा साहाय्यक आयुक्त मारहाणप्रकरणी चौघांना अटक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. दुसरीकडे आपली मुलगी आणि जावई यांच्या हत्येची सुपारी देणारे महेश आहेर यांच्यावर संघटित गुन्हेगारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार आमदार आव्हाड यांनी पोलिसांकडे केली आहे.

आव्हाड यांच्या मुलीच्या हत्येची सुपारी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बुधवारी आव्हाड समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली होती. सहायक आयुक्त महेश आहेर यांची सुपारी देणारी वादग्रस्त ऑडिओ बुधवारी बाहेर येताच आमदार आव्हाड यांनी ती ट्विट केली आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय गेटवर महेश आहेर यांना मारहाण केली. याप्रकरणी आहेर यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अभिजित पवार हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशंत गायकवाड व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मात्र आहेर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ठाण्यातील सर्व राजकीय पक्षांनीही संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली.

  • आ. जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या केबिनमध्ये कशा प्रकारे लाखो रुपयांची रोकड मोजली जात आहे, याचा व्हिडीओ ट्विट करीत ही रक्कम कुठून आणि कुणाला वाटण्यात येते, याची चौकशी करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची लेखी तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर आणखीएक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत महेश आहेर यांच्या कार्यालयातील कर्मचारी पैसे मोजत असल्याचे दिसत आहे. या ऑडिओमध्ये मी दिवसाला ४० लाख आणतो आणि २० लाख वाटतो, महापालिका म्हणजे कुबेराचा खजिना आहे का? मी बाबाजीचा खास आहे, बाबाजी आहे कोण? हा बाबाजी म्हणजे सुभाषसिंग ठाकूर आहे. म्हाडात १०० फ्लॅट खोट्या सह्या करून वेगवेगळ्या माणसांना विकले आहेत. गेली अनेक वर्षे इस्टेट विभाग त्यांच्या ताब्यात आहेत. महापालिकेच्या इस्टेटीचे बारा वाजविले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी लावली तर सर्व सत्य समोर येईल, त्याचे बारावीचे सर्टिफिकेटही खोटे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

Back to top button