लग्न घटीकेआधीच सापडली हरवलेली अंगठी! | पुढारी

लग्न घटीकेआधीच सापडली हरवलेली अंगठी!

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  सध्याच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा अजूनही टिकून असल्याचे एका घटनेवरून दिसून आले. शहरात चोरीच्या घटना वाढत असतानाच एका ज्येष्ठ नागरिकाने प्रामाणिकपणे रस्त्यावर सापडलेली सोन्याची अंगठी आणि घड्याळ असलेली पिशवी परत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अंगठी हरवल्याने चिंतीत असलेल्या लग्न घरात पुन्हा एकदा समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

गांधीनगर येथील ज्येष्ठ नागरिक मधुकर पवार हे रविवारी दुपारी पीएनटी कॉलनी परिसरात मंदिराजवळ बसले होते.
यावेळी येथील औषधाच्या दुकानातून बाहेर पडणाऱ्या हरिश विश्वकर्मा यांच्या पत्नीच्या हातातून एक पिशवी खाली पडली.  ही बाब पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या दोघांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र घाईगडबडीत असल्याने त्यांनी पवार यांच्याकडे लक्ष दिले नाही. दोघंही दुचाकीवरून निघून गेले.

 सोन्याची अंगठी व घड्याळ असलेली पिशवी घेऊन पवार यांनी पोलिस ठाणे गाठले. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पिशवीतील पावतीवर असलेल्या हरिश यांच्या नंबरवर संपर्क साधत घडलेली हकीकत सांगितली.  काही वेळातच हरीश पत्नीसह मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचले. ही पिशवी मधुकर पवार यांच्या हस्ते हरिश यांना देण्यात आली. घरातील लग्न कार्यासाठी विकत घेतलेली अंगठी परत मिळाल्याने समाधान व्यक्त करत हरिश विश्वकर्मा यांनी मधुकर पवार यांचे अभार मानले.

हेही वाचा :

 

 

Back to top button