अमित शहा-एकनाथ खडसे यांची भेट केवळ अफवा : महेश तपासे | पुढारी

अमित शहा-एकनाथ खडसे यांची भेट केवळ अफवा : महेश तपासे

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिल्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादीने देखील समाधान व्यक्त केले. या पार्श्वूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेची चाळीस वर्षापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. ही परंपरा बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत, याचा आनंद आहे. दसरा मेळावा फक्त शिवसेनाच नाही तर राज्यातले सर्वच पक्षातले कार्यकर्ते आणि नेत्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांची भेट केवळ अफवा आहे. अमित शहा व शरद पवार यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदेंनी फोन करून चर्चा केल्याचा दावा राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

वास्तविक महाराष्ट्रात झालेल्या शिंदे-फडणवीस सरकार यांच्यासंदर्भात कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. त्याच्यावर कायद्याने शिक्कामोर्तब झाले नाही. कदाचित 27 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यादृष्टीने येण्याची शक्यता आहे; परंतु कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला संभ्रमामध्ये टाकण्यासाठी शिंदे गटाच्या माध्यमातून देखील बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याचा आयोजन करण्यात आल्याचा आरोप प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे संस्कृती म्हणजे दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून दसरा मेळावा घेण्याची परंपरा ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची आहे. त्यात अशा पद्धतीचा नवीन वाद निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न जो चाललाय तो एवढा विकोपाला जाता कामा नये. ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असेही तपासे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. ज्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या संदर्भातली बातमी आहे ती भेट झालेली नाही. केवळ फोनवर चर्चा झालेली आहे. परंतु ती भेट घ्यायच्या आधी खडसे या विषयी शरद पवार यांना सांगून त्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत, असा तो विषय आहे. तसेच एकनाथ खडसे एकटे जाणार नव्हते, शरद पवार त्यांच्या सोबतच जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. कदाचित ते भाजपमध्ये जातील ही देखील अफवा आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे पद आणि महाराष्ट्रातल्या पक्षाच्या संदर्भातल्या काही महत्त्‍वपूर्ण जबाबदाऱ्या देखील एकनाथ खडसे यांच्‍याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा विषय चुकीचा आहे, असेही तपास यांनी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button