गणेशोत्सवासाठी पोलीस दल सज्ज | पुढारी

गणेशोत्सवासाठी पोलीस दल सज्ज

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  दोन वर्षांच्या संकट काळानंतर आलेला यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत असून गणेशोत्सव खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. उत्साहाचे वातावरण आणि गणेश उत्सवात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात केला आहे.

गणेशोत्सव काळात कुठेही कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये, म्हणून 7 पोलीस उपायुक्त, 14 सहाय्यक पोलिस आयुक्तांसाह एकूण 259 पोलिस अधिकारी, 650 पोलिस कर्मचारी आणि दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या संपूर्ण परिस्तिथीवर नजर ठेवून राहणार आहेत.
सण उत्सव काळात शांतता भंग होईल, असे कृत्य करणार्‍या रेकॉर्डवरील उपद्रवी व्यक्तींना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. तर सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. अफवा फसवणारे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे मॅसेज टाकल्यास संबंधित व्यक्ती व ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे कुठलेही कृत्य करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरले होते. यंदा मात्र, कुठल्याही निर्बंधाविना गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून त्याचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आपल्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी ठाणे नगरी सज्ज झाली आहे. खरेदीची लगबग वाढली असून सर्वत्र बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. यावेळी कायदा व्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत.

अधिकारी व कर्मचारी असे एकूण 1 हजाराहून अधिक पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात केला आहे. त्यात 7 पोलीस उपायुक्त, 14 सहाय्यक पोलिस आयुक्तांसाह एकूण 259 पोलिस अधिकारी व सुमारे साडेतीन 650 पोलिस आणि दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्यांचा समावेश राहणार आहे. दोन वर्षांपासून बाप्पा आगमन व विसर्जनावेळी गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध यंदा हटवण्यात आले आहेत. त्यामुळे बापांच्या मिरवणुका धुमधडाक्यात निघणार आहेत.

मिरवणूकवेळी मुख्य मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून वाहतूक पोलिसांनी देखील ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. बाहेरून येणार्‍या वाहनांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे गणेशउत्सव काळात उपद्रवी ठरणार्‍या व्यक्तींवर आणि गुन्हेगारांवर अत्यंत करडी नजर ठेवली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलिस हिटलिस्टवर असणार्‍या गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्तींना पोलीस प्रशासनाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ध्वनिक्षेपक, नियमांच्या बाबतीत दक्षता

ठाणे महापालिका हद्दीतील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांना त्या त्या भागात बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी रोज भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे देखील निर्देश पोलिसांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत.

गणेश मंडळाकडून ध्वनिक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवला जात आहे का, कोणी नियमांचे उल्लंघन करीत नाही ना, याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीला 500 स्वयंसेवक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे आयुक्तालयातील पाचही परिमंडळात पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून 1 हजार 80 सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना तर 1 लाख 50 हजार घरगुती आणि 20 हजार गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

अफवा पसरवल्यास कारवाई

गणेश उत्सव काळात सोशल मीडियावर खोटी माहिती अथवा अफवा पसरवणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. कुठलाही अनुचित मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीसीटीव्हीची नजर

मोठ्या गणेशोत्सव मंडळांना मंडपाजवळ सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख मंडळांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर असणार आहे. मंडळांनी त्यांच्या मंडपाजवळ गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत, अशाही सूचना पोलिसांकडून त्यांना देण्यात आल्या आहेत. मंडळांनी नियमांचे पालन करावे. अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

Back to top button