ठाणे : शिवस्मारक उभारणे, मराठा आरक्षण हीच मेटेंना श्रद्धांजली – प्रवीण दरेकर | पुढारी

ठाणे : शिवस्मारक उभारणे, मराठा आरक्षण हीच मेटेंना श्रद्धांजली - प्रवीण दरेकर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाचा विकास, शिवस्मारक उभारणी आणि मराठा आरक्षणासाठी शेवटच्या
श्‍वासापर्यंत झटणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे बलिदान हे व्यर्थ जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देऊनच शिंदे- फडणवीस युतीचे सरकार हे मेटे यांना खर्‍याअर्थाने श्रद्धांजली वाहील,
अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विनायक मेटे यांच्या ठाण्यातील श्रद्धांजली सभेत दिली. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा ठाणे, सार्वजनिक शिव जयंती
समितीतर्फे रविवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीसाठी बीडवरून मुंबईला येताना मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला आणि एक झुंझार नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी ठाण्यात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मराठा समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या मेटे यांच्या तरुणपणापासून झालेल्या संघर्षातील आठवणींना उजाळा देताना जेष्ठ पत्रकार कैलास म्हापदी यांनी मुंबई, ठाण्यातील त्यांच्या संघर्षावर, चढत्या आलेखावर प्रकाश टाकला. तसेच त्यांचा अपघात की घातपात यासंदर्भात सरकारने सुरू केलेल्या चौकशीचा अहवाल समाजासमोर खुला करण्याची भावना व्यक्त केली. तर रंगारी ते नेता, मराठा आरक्षण आणि त्याअनुषंगाने मेटे यांची आंदोलने, त्याची तयारी याचा उहापोह करताना ज्य्ेष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांनी त्यांच्या विचाराचे सरकार पुन्हा आल्याने मराठा समाजाला आरक्षण लागू करणे आणि शिवस्मारक उभारणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा समाजातर्फे भावना व्यक्त केल्या.

समाजाच्या या भावना लक्षात घेऊन माजी विरोधी पक्ष नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रात शिवस्मारक उभारून मेटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
सरकार खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहील, असे आश्वासन उपस्थित मराठा समाजाला दिले. मराठा समाजासाठी मेटे यांनी दिलेले हे बलिदान सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही. फक्त मराठा समाजासाठी जगणारा, सतत काम करणारा,
आक्रमक आणि मराठा समाजाचा चेहरा म्हणून राजकारणात, समाजकारणात वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. त्यांनी निर्माण केलेली सामाजिक चळवळ, विविध विषय धसास लावू असेही ते म्हणाले. तर भाजपचे ठाणे शहर
अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिवंगत वसंत डावखरे, आर.आर. पाटील, विलासराव देशमुख आणि मेटे यांच्या घनिष्ट संबंधाबाबत आणि त्यांच्या विधिमंडळातील कामकाजबाबत आठवणी सांगितल्या. मराठा आरक्षण आणि अन्य मागणीबाबत मेटे हे सभागृहात किती आक्रमक होत असत, असे सांगताना त्यांच्या मृत्यूबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावली आहे, त्यामुळे यासंदर्भात राजकारण कुणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सभागृहात प्रभावी मांडणी करणारे मेटे यांच्याकडून विधिमंडळाचे काम शिकायला मिळाले, ते कधी राजकीय नेते वाटले नाही, तसे जगले नाही, त्यांनी मराठा आरक्षणासह दुर्ग संवर्धनासाठी खूप काम केले असून वंचित, शोषितसाठी लढता लढता विनायकराव शाहिद झाले, त्यांनी बलिदान दिले. जेव्हा मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पहिले नाव विनायक मेटे यांचे घेतले जाईल, अशा भावना केळकर यांनी व्यक्त केल्या. केवळ मराठा आरक्षण,
शिवस्मारक उभारणी नव्हे तर इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना ही सर्वप्रथम विनायक मेटे यांची असल्याचे जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांनी सांगितले. हे उघड गुपित आरपीआय नेते विजय कांबळे हे नेहमी जाहीरपणे सांगतात असे सांगून सपाटे यांनी मेटे यांच्या गावापासून आरक्षणाचा संघर्ष, आमदारकी, शिवस्मारक, त्यानुषंगाने लिहिलेले पुस्तक आणि सर्व पक्षीय नेत्यांसोबत,
कार्यकर्त्यांसोबत असलेले संबंध याबाबत आठवणी सांगताच सभागृह स्तब्ध झाले होते.

यावेळी रमेश आंब्रे, दत्ता चव्हाण, सुधाकर पतंगराव, नंदकुमार देशमुख, संतोष सूर्यराव यांनी त्यांच्या आठवणी जागविल्या. यावेळी मेटे यांचे नातेवाईक शंकर घरबडे यांच्यासह सभागृहात शेकडो मराठा बांधव, बहिणी ह्या श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होत्या.

Back to top button