ठाणे कारागृहात बंदीवानांकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वधस्तंभास अभिवादन | पुढारी

ठाणे कारागृहात बंदीवानांकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वधस्तंभास अभिवादन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील स्मृतीस्तंभ, ऐतिहासिक वधस्तंभास तसेच कारागृहात फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेस आमदार संजय केळकर व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अभिवादन केले. कारागृहातील बंदिवानांनी देशभक्तीपर गीत गाऊन तसेच नृत्याविष्कार सादर करून अमृत महोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्यावतीने कारागृहातील ऐतिहासिक वधस्तंभास व स्मृतीस्तंभास अभिवादन कार्यक्रम आज (दि.१३) झाला.

यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर व आमदार केळकर यांनी पत्रकारांसह कारागृहातील विविध कामांची तसेच सुविधांची पाहणी केली. वधस्तंभाच्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात येत असून त्याची पाहणीही यावेळी केली. उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव, तहसीलदार युवराज बांगर आदी उपस्थित होते.

क्रांतिकारकांचे वधस्तंभ आणि ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांना पाहता यावा, याकरिता स्वतंत्र दरवाजा करावा, अशी मागणी सातत्याने होत असून त्याकरिता दैनिक पुढारीने अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी घेऊन कारागृहात हा उपक्रम राबवून आणखी एक कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास मार्च २०२३ पर्यंत स्वातंत्र्य लढ्यातील साक्ष देणारे फाशी गेट नागरिकांसाठी खुले होईल, असा आशावाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  बंदींच्या कलागुणांचा अविष्कार असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी झाला. तिथे बंदीवानांना शुभेच्छा देताना आमदार  केळकर म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातील बंदींसाठी हा विशेष कार्यक्रम होत आहे. बंदीजनांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना, स्थळे यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी कारागृहातील वधस्तंभाचा परिसर सुशोभित करण्यात येऊन सामान्य जनांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात ठाणे कारागृहात बंदी असलेल्या तसेच येथे फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती भावी पिढीला व्हावी, यासाठी वधस्तंभ स्मारकाचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कारागृहातील बंद्यांसाठी आणखी चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

देशभक्तीपर नृत्य-गीतांतून बंद्यांनी जागविल्या आठवणी

यावेळी आयोजित कार्यक्रमात कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच पुरुष व महिला कैद्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जागविल्या. ऐ मेरे प्यारे वतन, वंदे मातरम्, माँ तुझे सलाम अशा विविध गीतांवर कैद्यांनी नृत्य केले. प्रास्ताविकात कारागृह अधीक्षक  अहिरराव यांनी कारागृहात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button