एक दिवस ठाणेकरांना देणार -मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

एक दिवस ठाणेकरांना देणार -मुख्यमंत्री शिंदे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : धोधो पडणार्‍या पावसात आठ तास रस्त्यावर उभे राहून महिलांसह ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले. ठाणेकर शिवसैनिकांचे हे प्रेम पाहून सर्व प्रोटोकॉलला छेद देत ते थेट शिवसैनिक, ठाणेकरांमध्ये घुसले आणि त्यांना अभिवादन केले, हात मिळविले. त्यांच्यासमोर भावुक झाले. एक बार कमिटन्मेंट दिली तर स्वतःच्या मनाचाही ऐकत नाही असे म्हणत शिंदे यांनी सर्वसामान्य शिवसैनिक, ठाणेकरांमुळे मी मुख्यंमत्री झालो असून तुम्हाला भेटण्यासाठी एक दिवस देणार असल्याची ग्वाही दिली.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी रात्री ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांच्यासमोर नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण केली. त्यावेळी 50 आमदार सोबत होते. त्यांनीही धर्मवीर दिघे यांना अभिवादन केले. जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कोकण विभाग परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आनंदाश्रमात ठाणेकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार माजी महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम. योगेश जानकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध

ठाणेकरांचे आभार मानताना शिंदे म्हणाले, एवढ्या पावसात महिला माझ्या स्वागतासाठी उभ्या राहिल्या. महिला शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे, त्याला कुठलीच शक्ती हरवू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिदुत्व पुढे नेण्यासाठी 50 आमदारांना घेऊन उठाव केला असे सांगून संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून मंदार संघातील कामे मार्गी लावणार आहे, शेतकर्‍यांचे, गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करण्याचे वचन दिले. सर्वसामान्य घटकांचा, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Back to top button