ठाणे जिल्ह्यात 1 हजार 661 बालके कुपोषित | पुढारी

ठाणे जिल्ह्यात 1 हजार 661 बालके कुपोषित

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत कमी झाल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला असला तरी सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात 122 मुले अतितीव्र कुपोषित (सॅम) असून 1 हजार 539 बालके तीव्र कुपोषित (मॅम) आहेत. बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचे रूपांतर अतितीव्र कुपोषित श्रेणीत होण्यापासून रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. या मुलांसाठी जिल्हा परिषदेची पोषणवडी उपायकारक ठरणार असून, यामुळे नव्याने मुले कुपोषित होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांनी सांगितले.

गरोदरपणात मातेला योग्य आहार न मिळाल्यास मूल कुपोषित किंवा कमी वजनाचे जन्माला येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध, आयोडीनयुक्त ‘अ’ जीवनसत्व असलेला, प्रथिनेयुक्त आणि खनिजयुक्त पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. जिल्ह्यात 1 हजार 596 नियमित तर 298 मिनी अशा एकूण 1 हजार 894 अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविकांतर्फे दर महिन्याला बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते, तर मॅम बालक हा तीव्र स्वरूपात कमी वजन असलेला बालक असतो. सॅम बालकाला एक महिन्यापर्यंत अंगणवाडीमध्ये किंवा आरोग्य केंद्रात आहार पुरविण्यात येत असतो. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या द़ृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत असते.

Back to top button