माळशेज घाटाच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचा वावर | पुढारी

माळशेज घाटाच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचा वावर

मुरबाड / टोकावडे : पुढारी वृत्तसेवा :  माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंबडपाडा गावाजवळील जंगलात बिबट्याने एका आदिवासीच्या तब्बल बारा बकर्‍यांचा फडशा पाडला आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या गोष्टीला दुजोरा दिला.

माळशेज घाटाच्या पायथ्याशी अनेक वाडयावस्त्या असुन मोठया प्रमाणात आदिवासी बांधव रहात आहेत.उदार निर्वाहसाठी कोणतीच उपाय योजना नसल्याने येथिल आदिवासी बांधव पोट भरण्यासाठी सातत्याने घाट माथ्यावर जात असतात. तर काही तुटपुंज्या पैशात काही तरी व्यवसाय करत असतात. त्यामुळे येथिल बहुतेक आदिवासी बांधवांकडे पाच, दहा, वीस अशा बक-यांचे पालन करुन आपला उदरनिर्वाह करत असतात.

टोकावडेपासुन माळशेज घाटापर्यंत बहुतेक जंगलचा भाग असल्याने काही ठिकाणी घनदाट जंगल दिसुन येते.त्यामुळे येथिल आदिवासी बांधव आपल्या बकर्‍या व जनावरे घेवुन सातत्याने जंगलात चरण्यासाठी घेवुन जात असतात. माळशेज घाटाच्या पायथ्याशी कोंबाळपाडा म्हणुन आदिवासींची वस्ती आहे. याच गावात चिमा श्रावन कोंडावळे यांच्या बकर्‍या आहेत. तीन दिवसापुर्वी चरण्यासाठी जंगलात बकर्‍या घेवुन गेला असता कळपातील काही बकर्‍या घरी परतल्याच नाहीत. मात्र बकर्‍यांचा जंगलात शोध घेतला असता जवळजवळ बारा बकर्‍या या मृत अवस्थेत आढळुन आल्याने मोठ्याप्रमाणात या मालकाचे नुकसान झाले आहे.

एकीकडे जगण्याची धडपड तर एकीकडे मोठ्या प्रमाणात बकर्‍यांचे नुकसान.त्यामुळे येथिल आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत.मात्र वनविभागाला याची माहिती मिळताच वनपाल श्रीकांत बेलदार व काही कर्मचारी यांनी घटनास्थळी पहाणी केली असता सदरच्या बकर्‍या वेग वेगळया ठिकाणी मृत अवस्थेत आढळुन आल्याची माहिती वन विभागाकडुन देण्यात आली.

Back to top button