दरडी कोसळण्याची आपत्ती मानवनिर्मितच, भूगर्भ शास्त्रज्ञांचा निष्कर्ष | पुढारी

दरडी कोसळण्याची आपत्ती मानवनिर्मितच, भूगर्भ शास्त्रज्ञांचा निष्कर्ष

अलिबाग ः जयंत धुळप : सह्याद्री रांगातील पश्चिम घाटातील पावसाचा जोर जसजसा जोर वाढत जातो तसतसा घाट रस्त्यांमध्ये आणि डोंगराला खेटून असलेल्या गावांवर दरड कोसळण्याच्या भितीचे सावट घोंगाऊ लागते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांतील तळीये गावांत गतवर्षी दरड कोसळून झालेल्या भिषण दुर्घटनेनंतर पून्हा एकदा दरडी कोसळण्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
गेल्या वीस ते बावीस वर्षांत दरडी कोसळण्याचे प्रमाण राज्यात विशेषतः कोकणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, या घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याचे भूगोल आणि भूगर्भ अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या रस्त्यांमुळे दरडी पडत असे एक कारण त्यांतून समोर आले आहे.

आजवर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, ताम्हिणी घाट, माळशेज घाट, वरंध घाट, आंबेनळी घाट, खंबाटकीसह कोकणातील बहूतेक सर्व घाट रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारीच महाड जवळच्या वरंध गाटात दरड टपरिवर कोसळून एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. यातील अनेक घटनांमध्ये मोठ्या आकाराचे दगड रस्त्यावर कोसळतात. रस्ते बंद होऊन वाहतूक ठप्प होते. पुढे महिनाभर दरडींसंदर्भात शासकीय पातळीवर ठोस नियोजनाबद्दल चर्चा होते, परंतू अतिम उपाययोजना होत नाही. गतवर्षी महाड पुणे दरम्यानच्या भोर घाटात दरडी कोसळून हा घाट बंद झाला होता. गतवर्षी पावसाळा संपल्यावर या घाटातील आवश्यक ती दरडप्रतिबंधक उपाययोजना पूर्ण होणे अपेक्षीत होते, मात्र ती पूर्ण झाली नसल्याने यंदा देखील दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने यंदा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत हा घाट वाहतूकीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

घाट रस्ते करताना झालेली वृक्षतोड, खणलेले चर, उतारांचे केलेले सपाटीकरण, उभारलेली सिमेंटची जंगले ही पावसाळ्यात दरडी कोसळण्याची प्रमुख कारणे ठरत आहेत. डोंगरात नवीन रस्ते बांधताना किंवा रुंदीकरणादरम्यान उतारांवरील बदलांमुळे; तसेच बोगदे खणताना उडणार्‍या सुरुंगांमुळे डोंगरांवरील तडे गेलेले खडकांचे थर अस्थिर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला या थरांचा आधार सुटतो आणि अतिवृष्टीच्या वेळी ते कोसळतात, असे अभ्यासकांचे मत आहे.

दरडी कोसळण्याच्या या समस्येचा सखोल अभ्यास करुन शासकीय यंत्रणांना या बाबतच्या प्रतिबंधक उपाययोजना सूचवण्याचे काम ज्येष्ठ भूगर्भ अभ्यासक डॉ. सतीश ठिगळे हे स्वेच्छेने करित आहेत.

आपत्तीच्या अनुषंगाने ग्रामस्थांना प्रशिक्षण

काही वर्षांपूर्वीपर्यंत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्यात या आपत्तीचा समावेश नव्हता. अलीकडेच केंद्र सरकारने आपत्तींच्या यादीच दरड कोसळण्याच्या घटनांचा समावेश केल्याने महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने यादीत बदल केला आहे. पावसाळ्यापूर्वी घाट रस्त्यांवर पाहणी करून अपघात टाळण्यासाठी पावलेच उचली पाहिजेत, अशी अपेक्षा ठिगळे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार रायगड जिल्ह्यात भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व गावांचे सर्वेक्षण करुन संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी करण्यात आली आहे.

Back to top button