पत्नीच्या आजाराचे कारण सांगून डोंबिवलीकराला गंडा | पुढारी

पत्नीच्या आजाराचे कारण सांगून डोंबिवलीकराला गंडा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : अति हाव कशी भारी पडते, याचा प्रत्यय डोंबिवलीकराला आला. पत्नीला गंभीर आजार जडला आहे. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी जवळ पैसे नाहीत. त्यासाठी आमच्याकडील सोन्याची बिस्किटे ठेऊन घ्या आणि त्या बदल्यात रोख रक्कम द्या, असे सांगून मोबदल्यात दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन सोन्यासारखी चकाकणारी बिस्किटे या डोंबिवलीकर व्यावसायिकाच्या हातावर टेकवून दोघा भामट्यांनी पळ काढला. या व्यावसायिकाने भामट्यांनी दिलेल्या बिस्किटांची तपासणी केल्यानंतर मात्र कपाळावर हात मारून घेतला. ही घटना भर वर्दळीच्या कामगार नाक्यावर नेहरू रोडला घडली.

पूर्वेकडील आजदे गावातल्या साईबाबा मंदिर रोडला असलेल्या समर्थ सुजा इमारतीत राहणारा मिथून शिवराम चव्हाण (27) हा तरूण व्यावसायिक आहे. डोंबिवली पूर्वे तील नेहरू रोडला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ नाका कामगार आहे. या नाक्यावर मिथून उभा होता. तेथे दोन अनोळखी इसम आले. त्यांच्यापैकी एकाने मिथून चव्हाणला विनंती केली. माझी पत्नी गंभीर आजारी आहे. अपेंडीस आजार जडला असून तिच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. माझ्याजवळ सोन्याची बिस्किटे आहेत. ती तुम्ही घेऊन त्या बदल्यात मला तुम्ही दोन लाख रुपये द्या, असे सांगितले. सोन्याची बिस्किटे पाहून मिथून याला कमी किंमतीत सोने मिळते म्हणून मिथून याने 2 लाख रुपयांची तरतूद केली.

बिस्कटांना पिवळी लकाकी

दोन्ही इसम निघून गेल्यानंतर मिथून याने एका सोनाराकडे जाऊन सोन्याच्या बिस्किटांची वास्तवता तपासली. त्यावेळी त्यांना ही बिस्किटे सोन्याची नाहीत, ती बनावट आहेत. या बिस्किटांना वरून फक्त पिवळी लकाकी लावण्यात आली आहे, असे सोनाराने सांगितले. हे ऐकून मिथून याने कपाळावर हात मारला. त्या दोन्ही इसमांनी खोटी बतावणी करून आपणास फसविले.

Back to top button