ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पीक कर्ज वितरित | पुढारी

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पीक कर्ज वितरित

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार संजय केळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अग्रणी बँक व्यवस्थापक जे. एन. भारती आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात 15 जूनपर्यंत सुमारे 44 टक्के पीक कर्ज वितरीत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी शिबीरे आयोजीत करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नागरिकाच्या हितासाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. बँकांच्या शाखा ज्या भागात आहेत तेथील विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, असेही आमदार केळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत पुरेशा पावसाअभावी पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे चांगला पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज तातडीने वितरीत करण्यात यावे. आता पर्यंत केवळ 44 टक्के पीक कर्ज वितरीत झाले आहेत. त्याला गती आली पाहिजे. त्यासाठी शिबीरे आयोजित करून कर्ज वाटप प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिले.

Back to top button