कोल्हापूर: घुणकीजवळ वाहनाच्या धडकेत इस्लामपूरची महिला ठार, पती जखमी

घुणकीजवळ अपघातात राजश्री पवार यांचा मृत्यू झाला.
घुणकीजवळ अपघातात राजश्री पवार यांचा मृत्यू झाला.

किणी: पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूरहुन इस्लामपूर कडे निघालेल्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडवरील राजश्री राजेंद्र पवार (वय ४३, रा.अंबामाता मंदिराजवळ, इस्लामपूर) या जागीच ठार झाल्या. तर पती राजेंद्र ज्ञानदेव पवार जखमी झाले. पुणे- बंगळूर महामार्गावरील घुणकी गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलावर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, इस्लामपूर येथील राजेंद्र पवार आपली पत्नी राजश्री यांच्यासह मोपेड (एम एच १० बी यु ९३२८) वरून कोल्हापूर येथे सेवानिवृत्ती निमित्ताने नातेवाईकांनी आयोजित केलेल्या सदिच्छा कार्यक्रमास गेले होते. हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातून इस्लामपूरला जाण्यासाठी बाहेर पडले. ते महामार्गावरील घुणकी जवळील ओढ्याच्या पुलाजवळ आले असताना त्यांच्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, मोपेडवरून दोघेही लांब उडून पडले. गाडीवर पाठीमागे बसलेल्या राजश्री पवार रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकचे अंगावरुन चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर पती राजेंद्र पवार जखमी झाले.

महामार्गावर दुभाजक लावून एका रस्त्याचे दोन रस्ते केल्या ठिकाणीच अपघात झाल्याने वाहनांची दोन्ही बाजूला मोठी रांग लागली. पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. मात्र तब्बल दोन तासांनी वडगाव पोलीस पोहोचले. त्यामुळे पोलीस येईपर्यंत राजश्री यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून राहिला. यामुळे वाहनाची कोंडी निर्माण होऊन जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने घुणकी ओढ्याच्या पुलावर दररोजच अपघात होत आहेत. या टप्प्यात वाहनांचा वेग कमी असणे महत्वाचे आहे. यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे. अपघातानंतर पोलीस तब्बल दोन तासांनी अपघातस्थळी पोहोचले, याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.

अपघातातील मृत राजश्री यांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला होता. त्या इस्लामपुरातील एका पतसंस्थेत काम करत होत्या. तर पती राजेंद्र हे पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत. संसाराला हातभार लागावा, यासाठी गरजूंना त्या जेवणाचे डबेही करून देण्याचे काम करत होत्या. त्यांना दोन मुले आहेत. कष्टाळू आणि जिद्दी असणाऱ्या राजश्री पवार यांच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news