रायते येथे डोंगर-कड्यांवर रंगला सायकलिंगचा थरार | पुढारी

रायते येथे डोंगर-कड्यांवर रंगला सायकलिंगचा थरार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा एकीकडे पावसाळी वातावरण, डोंगरावर पसरलेली हिरवाईची चादर आणि अशा प्रफुल्ल वातावरणात डोंगर-कड्यांवर रंगलेला सायकलिंगचा थरार…निमित्त होते ते कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनने कल्याणजवळील निसर्गरम्य अशा रायते गावात आयोजित माऊंटन बाईकिंग स्पर्धेचे.

देशाच्या विविध राज्यातील अनेक खेळाडूंसह राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे दिग्गज सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. कोविडमुळे गेली दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र परिस्थिती आता सुधारत असल्याने कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनने यंदाच्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती.

कल्याणसह मुंबई, राजस्थान, आसाम, बंगळुरू, गोवा आदी राज्यातील 75 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा गाजवणार्‍या काही दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता. 11 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, पुरुष गट, इन्ड्युरो स्टेज फुल सस्पेन्शन आणि हार्ड ट्रेल अशा 5 गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.

माऊंटन बाईकिंग एक साहसी खेळ म्हणून जगभरात ओळखला जातो. त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या उद्देशाने कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशन गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. ज्या गोष्टी आपण मुंबईत किंवा देशाच्या इतर भागात करतो त्या सगळ्या गोष्टी कल्याण परिसरात देखील आपण आणू शकतो, या अनुषंगाने आम्ही कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवात केल्याची माहिती संस्थापक डॉ. अद्वैत जाधव यांनी दिली. यामध्ये रोड सायकलिंग, माऊंटन बाईकिंग, महिला सायकलिंग आणि ज्युनिअर सायकलिंग आदी उपक्रम राबवत असतो.

रायते गावातील 75 विद्यार्थ्यांना मदत

संपूर्ण देशभरात आम्ही 12 हजार तर कल्याण परिसरातून दीड ते दोन हजार सायकलिस्ट एकत्र असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे स्वामिनाथन अय्यर, सतीश द्विवेदी यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे रायते गावातील 75 विद्यार्थ्यांना मदत केली.

हेही  वाचा

Back to top button