गावातील कार्यकर्त्यांचे लक्ष मुंबईकडे; चौकाचौकांत गुवाहाटीपर्यंतची चर्चा | पुढारी

गावातील कार्यकर्त्यांचे लक्ष मुंबईकडे; चौकाचौकांत गुवाहाटीपर्यंतची चर्चा

राजेंद्र कवडे-देशमुख

बावडा : सध्या मुंबईत सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर गावागावांतील सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या कार्यकत्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचेही सतत लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या घडामोडींदरम्यान घडणार्‍या विविध घटनांवर सोशल मीडियावर विनोदी टिप्पण्यांचा पाऊस पडत असल्याने नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे भाजपच्या कार्यकत्र्यांमध्ये खुशीचे, तर महाविकास आघाडीच्या कार्यकत्र्यांमध्ये नाही म्हटले तरी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. सध्याच्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार की जाणार, याबाबत कार्यकत्र्यांमध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.

खेडोपाडी चौकाचौकांत, पारांवर कार्यकर्ते व नागरिक हे आपापली बाजू एकमेकांना पटवून देताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच मोबाईलमध्ये टीव्ही लावून कार्यकर्ते व नागरिक सतत मुंबई-गुवाहाटी-दिल्ली येथील राजकीय घडामोडींचा मागोवा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राजकारण किती खोलवर रुजलेले आहे, याचा प्रत्यय येत आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनी काय करायला पाहिजे? यावरही चर्चा झडत असून, बहुतांश कार्यकर्ते आपापल्या पक्षांचे वकील बनलेले दिसत आहेत.

इंदापूर तालुक्याजवळ असलेल्या सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या, ’काय ती झाडी, काय डोंगर, काय हाटील’ या ग्रामीण भाषेतील रांगड्या वक्तव्याला नागरिकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. तसेच, विविध राजकीय नेत्यांवरील विनोदी टिप्पण्यांना नागरिक व कार्यकर्ते हसून मनमुरादपणे दाद देत आहेत. घराघरांतील राजकीय परिस्थितीवर चर्चा होताना दिसत आहे. जनतेच्या व कार्यकत्र्यांच्या नसानसांत राजकारण भिनलेले असल्याने मुंबईतील राजकीय पेच सुटेपर्यंत कार्यकर्ते व नागरिकांच्या हातातील मोबाईल सुटणार नाहीत, एवढे मात्र खरे.

कार्यकर्त्यांमध्ये ‘चाय पे चर्चा’ !
सध्याचा विषय हा राज्यपातळीवरील असल्याने भाजप व राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते हे एकमेकांना भेटल्यावर त्यांच्यामध्ये मुंबई, गुवाहाटीतील राजकीय घडामोडींवर खेळीमेळीत व विनोदी स्वरूपात ‘चाय पे चर्चा’ होताना दिसत आहे.

नागरिक कोरोना विसरले!
गेल्या एक आठवड्यापासून निर्माण झालेल्या राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या चर्चेमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरिक अहोरात्र एवढे गढून गेले आहेत, की त्यांना सध्याच्या कोरोनाच्या चौथ्या लाटेचा विसर पडला आहे. कोणीही कोरोनाचे नियम पाळत नाही. त्यामुळे यावर कार्यकर्त्यांना व जनतेला कोरोनापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटत असावे, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.

Back to top button