कोकण पर्यटनाला डॉल्फिन सफारीचा साज | पुढारी

कोकण पर्यटनाला डॉल्फिन सफारीचा साज

ठाणे ; शशिकांत सावंत : गेल्या 5 वर्षांत कोकणातील पर्यटनाला डॉल्फिन सफारीचा साज चढल्याने पालघर ते सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या पाच जिल्ह्यांमध्ये डॉल्फिन सफारीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. दरवर्षी 25 लाखांपेक्षा जास्त पर्यटक हे पर्यटनासाठी कोकण किनारपट्टीला भेट देतात. पालघरमध्ये माहीम, केळवे, रायगडमध्ये अलिबाग, उरण, मुरूड, श्रीवर्धन, रत्नागिरीमध्ये दापोली, गणपतीपुळे, दाभोळ, हर्णे, तर सिंधुदुर्गातील निवती, देवबाग, मिठबांव, मालवण, देवगड, कुणकेश्वर, वेंगुर्ले अशा किनार्‍यांना पर्यटकांची पसंती वाढली आहे.

डॉल्फिन बघण्याच्या कुतूहलापोटी कोकणात गेल्या पाच वर्षांमध्ये पर्यटकांना सागरकिनार्‍यांची ओढ लागल्याने गर्दी वाढत आहे. सिंधुदुर्गातील निवती, रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली, श्रीवर्धन, दिघी अशा किनार्‍यांवर या डॉल्फिन सफारी पाहायला मिळत आहेत. मात्र, अलीकडे झालेल्या तापमानवाढीमुळे डॉल्फिन, व्हेल या माशांचे किनारपट्टीवर झालेले मृत्यू आणि किनारपट्टीवर आलेला तेलतवंग, यामुळे बहुसंख्य पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तथापि, डॉल्फिनचे आकर्षण पर्यटकांना समुद्राकडे ओढून नेत असल्याने स्वच्छ किनार्‍यांवर हे पर्यटन सुरूच आहे.

डॉल्फिन हा अतिशय संवेदनशील सस्तन प्राणी आहे. 2019-20 आणि 2020-21 या लॉकडाऊन काळात डॉल्फिनचे कळप मोठ्या प्रमाणावर कोकण किनारपट्टीवर आढळले होते. त्यामुळे डॉल्फिन सफारींना जणू सुगीचे दिवस आले. सागरी धोक्याचा अंदाज डॉल्फिनला लवकर येतो, त्यामुळे कोकणातील प्रदूषित किनार्‍यांपासून डॉल्फिन दूर गेला असला; तरीही गणपतीपुळे, निवती, श्रीवर्धन किनार्‍यांवर डॉल्फिनचे कळप यावर्षी पर्यटकांना पाहायला मिळाले.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये नऊ समुद्रकिनार्‍यांवर डॉल्फिनचे समूहाने वावरणे पर्यटकांना एक वेगळाच आनंद देऊन जाते. पर्यटकांना हमखास डॉल्फिन दर्शन घडविणारा सागरकिनारा म्हणजे निवती. रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, दिघी येथेही डॉल्फिन सफारी वर्षातून 10 ते 12 वेळा हटकून चकरा मारतातच. हिवाळ्यात प्रामुख्याने या सफारींना बहर येतो.

किनारपट्टीवर डॉल्फिनची संख्या रोडावण्यामागे तापमानात झालेले बदल, प्रदूषित पाणी, तेलतवंग ही कारणे आहेत. मात्र, सिंधुदुर्गातील मिठबांव, निवतीसह कोकणातील 9 किनारे आजही प्रदूषणमुक्त आहेत. तेथे या सफारींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पाण्याचे तापमान वाढल्याने डॉल्फिनचे मृत्यू

यंदा किनारी भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान पाच अंशांनी वाढले होते. त्यामुळे डॉल्फिनचे मृत्यू झाले. मात्र, हे पर्यटन वाढविण्यासाठी डॉल्फिनसंवर्धन मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉल्फिन हा जलचर प्राणी असला, तरी पाण्याच्या बाहेर काही काळ तो राहू शकतो. डॉल्फिनच्या जगभरात 40 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात 9 जाती दिसून येतात. डॉल्फिन ताशी 29 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतो. त्याचे दात शंकूच्या आकाराचे असल्याने शिकार करण्यासाठी ते उपयुक्त असतात. त्यामुळे शिकारीच्या मागे तो वेगाने धावतो. थंड पाण्यापेक्षा उबदार पाण्यात त्याची वाढ चांगली होते. त्यामुळे भारतीय समुद्रात डॉल्फिन मोठ्या प्रमाणात आढळतात.

कप परेड, भांडुपसह समुद्राला जोडून असणार्‍या कांदळवनाच्या नजीकच्या भागात डॉल्फिन आढळून आले होते. याच्या कारणांवर अद्याप प्रकाश पडलेला नाही. उरण, केगाव किनारपट्टी भागातही नऊ फुटी डॉल्फिन गेल्यावर्षी आढळून आले होते. दापोली, पाळंदे, सालधुरे येथेही किनारपट्टीवर डॉल्फिन आढळतात. मुरूड, पाळंदे, हर्णे, तारकर्ली, देवबाग, निवती येथे खास फायबर बोटीने डॉल्फिन पर्यटन सफारी केल्या जातात.

कोकण किनारपट्टीत दिसून येणारे आणि कोकणातील सागरी पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारे डॉल्फिन यंदा कोकण किनारपट्टीवर कमी प्रमाणात आढळून आले. याबाबत अनेक समुद्रजीव अभ्यासक चिंता व्यक्त करीत आहेत. यंदा तापमानात झालेली विक्रमी वाढ आणि अरबी समुद्रातील विविध वादळे, प्रदूषण व सातत्याने घडून येत असलेले बदल, याचा परिणाम समुद्रातील माशांसह डॉल्फिनवरदेखील झाला आहे.

या पार्श्वभूमीवर आपले निष्कर्ष सांगताना डॉ. मोहिते म्हणाल्या, गेल्या काही वर्षांपासून विनाशकारी हिट वेव्हज, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. भारताचाच विचार केला, तर 2019-20 मध्ये फयान, वायू, निसर्ग, क्यार अशाप्रकारची भयंकर वादळे आली. तर 2020-21 मध्ये आंफान, यास, तोक्ते, निसर्ग, शाहिन, जवाद, गुलाब, बुलबुल अशी 140 ते 260 कि.मी. प्रतितास वार्‍याची वादळे आली, त्याचा परिणाम मत्स्य जीवनावर झाला आहे. मात्र, तरीही डॉल्फिन या किनार्‍यांवर दिसतात, हा सकारात्मक संदेश आहे. म्हणूनच किनारपट्टी प्रदूषण थांबले; तर डॉल्फिन येत राहतील, असे संशोधक सांगतात.

Back to top button