‘कसा आमदार होतोय ते मी बघतोच’ : अजित पवारांचे आ. अशोक पवार यांना आव्हान | पुढारी

‘कसा आमदार होतोय ते मी बघतोच’ : अजित पवारांचे आ. अशोक पवार यांना आव्हान

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : माझ्यामुळे घोडगंगा साखर कारखाना बंद पडला, हा खोटा आरोप आहे. उलट आमदार अशोक पवार यांच्या चुकीच्या कारभारामुळे घोडगंगा साखर कारखाना बंद पडला आहे. ‘आगामी निवडणुकीत आमदार अशोक पवार कसा आमदार होतोय ते मी पण बघून घेतो, मी भल्याभल्यांची जिरवली आहे. मी मनावर घेतलं की ते होतेच, मी नावाचा अजित पवार आहे’ असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना दिले आहे.

महायुतीचे उमेदवार

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरे (ता. शिरूर) येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
घोडगंगा साखर कारखाना माझ्यामुळे बंद पडला, हा अशोक पवार यांचा आरोप खोटा आहे. उलट त्याच्यामुळेच कारखान्याचे वाटोळे झाले. स्वतःच्या मुलाची कोरी पाटी असताना कुठलाही अनुभव नसताना कारखान्याचे चेअरमन केले. व्यंकटेश कारखाना कसा काय चालू आहे? मग घोडगंगा का बंद? हा सवाल तुम्ही विचारला पाहिजे. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

2019 ची आठवण

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत असेच आव्हान अजित पवार यांनी पुरंदर-हवेलीचे त्या वेळचे आमदार, माजी मंत्री आणि सध्याचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना दिले होते, त्या विधानाचे प्रतिध्वनी अद्यापही उमटत असताना आता अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना या लोकसभा निवडणुकीत आव्हान दिले आहे. या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर अजित पवार यांच्या त्या विधानामुळे दुखावलेल्या शिवतारे यांनी थेट बंड पुकारले होते, त्यांना समजावण्यासाठी अजित पवार यांना फार धावपळ करावी लागली होती.

हेही वाचा

Back to top button