सांगली : सोलापुरातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी पकडण्यात विटा पोलिसांना यश | पुढारी

सांगली : सोलापुरातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी पकडण्यात विटा पोलिसांना यश

विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात दरोडा टाकण्यासाठी आले ली सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी पकडण्यात विटा पोलिसांना यश आले. यात जितेंद्र भानुदास काळे (वय३०), सुखदेव शिवाजी काळे (वय३२), किरण शिवाजी काळे (वय२९), बालाजी माणिक पवार (वय२६,रा. सर्व मार्डी, ता. उत्तर सोला पूर),दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२रा. राण मासळे ता उत्तर सोलापूर) आणि शिवाजी रामा काळे (वय२६ मुळ राहणार आणि ता जत, जि. सांगली, सध्या रा.मार्डी) अशी त्यांची नावे आहेत.  याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी फिर्याद दिली अशी माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी माहिती दिली की, काल रविवारी सायंकाळी विटा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रमोद साखरपे यांना टीप मिळाली की, एका पांढऱ्या रंगाच्या इरटिगा गाडीतून ५ ते ६ इसम हे शस्त्रा सह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने भिवघाट मार्गे विटाकडे येत आहेत. प्रमोद साखरपे यांनी मला याबाबत माहिती दिल्यानंतर रात्री ११.३० वा चे सुमारास पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमल दार आणि दोन पंचाना बोलावून वेगवेगळया ४ टिम बनवल्या. त्यांना योग्य त्या सूचना देवून विटा ते भिवघाट जाणारे मार्गावर सर्व स्टाफसह रेणावी घाटामध्ये थांबलो. त्यावेळी भिवघाट कडून एक पांढऱ्या रंगाची इरटिगा गाडी येवुन मुळ स्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबली. त्यामुळे आम्हाला त्या गाडीचा संशय आल्याने आम्ही त्या गाडीस गराडा घातला. त्या गाडीत एकुण ६ जण होते, त्यांना खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कटवणी,एक मोठी पक्कड,एक लाकडी मूठ असलेला कोयता, एक लाकडी दांडके,नायलॉन दोरी, चाकू,स्क्रू ड्रायव्हर आणि मिरची पुड असे साहित्य होते. त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी विटा येथे दरोडा टाकुन पैसा व सोने चोरण्यासाठी आलो, अशी कबूली दिली.

त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्याकडून रोख ९ हजार ६०० रुपये, चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली साडेपाच लाख रुपयांची गाडी असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील जितेंद्र काळे, सुखदेव काळे, किरण काळे, बालाजी पवार,दादाराव पवार आणि शिवाजी काळे हे सहाही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते दरोडेखोर आहेत. त्यांच्यावर यापुर्वी अनेक चोऱ्या, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आज सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रिमांड देण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. त्यांच्याकडे आणखी तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली असेही पोलीस निरीक्षक डोके यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button