सोलापूर : 300 जणांचा आज बीआरएसमध्ये प्रवेश नगरसेवक, विविध संस्थाध्यक्षांचा समावेश | पुढारी

सोलापूर : 300 जणांचा आज बीआरएसमध्ये प्रवेश नगरसेवक, विविध संस्थाध्यक्षांचा समावेश

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांच्या सोलापूर दौर्‍याला फलित आले आहे. भाजपचे नागेश वल्याळ यांच्यासह अनेक माजी नगरसेवक तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरश गोप हे सुमारे 300 कार्यकर्ते-समर्थकांसह शनिवारी (दि. 8) हैदराबादला जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

गत चार महिन्यांपासून केसीआर यांचे सोलापूरवर विशेष लक्ष आहे. सोलापुरात सुमारे पाच लाख तेलुगूजन असल्याचे हेरून त्यांचा सोलापूर शहरात बीआरएसची प्रभावीपणे उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे माजी खा. धर्मण्णा सादूल हे बीआरएसच्या गळाला लागले खरे पण शहरातील राजकीय दिग्गज नेते, समाजघटकही काबीज करणे बीआरएसचे लक्ष्य होते. पण या पक्षाला या संदर्भात यश येत नसल्याने सोलापुरात बीआरएस रुजेल का याविषयी साशंकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी दर्शनाच्या निमित्ताने अख्खे मंत्रिमंडळ, आमदार- खासदार आदींसह सोलापूरची वारी केली.

देवदर्शनाचे निमित्त असले तरी प्रत्यक्षात पंढरपूरचे युवा नेते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमदेखील या दौर्‍यात होता.
भालके यांच्या कार्यक्रमानंतर सरकोली येथून थेट तुळजापूरला जाण्याऐवजी केसीआर थेट पुन्हा सोलापूर शहरात येऊन राजकीय खलबते केली. भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या घरी जाऊन त्यांनी भाजपच्या एकूण पाच नगरसेवकांना बीआरएसची ऑफर दिली. यानुसार वल्याळ यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे गत दोन महिन्यांपासून बीआरएस प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनीदेखील बीआरएसचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला.

वल्याळ, गोप हे दोन पूर्व भागाचे दिग्गज सुमारे 300 समर्थकांना घेऊन शनिवारी हैदराबादमध्ये जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हैदराबादमधील बीआरएसच्या कार्यालयात दुपारी चार वाजता प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील राजकीय उलथापालथीचा आगामी काळात कोणाला फटका बसणार याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button