हजारो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत महाद्वार काला | पुढारी

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीत महाद्वार काला

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : हरी नामाच्या गजरासह लाह्या व बुक्क्याची उधळण करीत येथील महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात झाला. महाद्वार काल्याने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.

येथील हरिदास घराण्यात गेल्या दहा पिढ्यापासून काल्याचा उत्सव साजरा केला जातो. हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने दर्शन देत आपल्या खडावा भेट दिल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून हरिदास व संत नामदेव महाराज यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

आज परंपरे प्रमाणे निवृत्ती महाराज नामदास यांची दिंडी हरिदास वेसेतील काल्याच्या वाड्यात दाखल झाली. विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर गोपाळ काला गोड झाला, गोविंदाने गोड केला या गजरात हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे दाखल झाला. मंदिरात पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दही, लाह्याने भरलेली हांडी फोडण्यात आली. यानंतर महाद्वार घाटावरून सोहळा चंद्रभागा नदीकडे नेण्यात आला. त्याठिकाणी पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माहेश्वरी धर्मशाळेत दही हंडी फोडून हरिदास वेस मार्गे सोहळा पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. याठिकाणी हजारो भाविकांनी हजेरी लावली. भाविक जागोजागी कुंकू, बुक्का व लाह्याची उधळण करीत पादुकांचे दर्शन घेत होते. काल्याच्या वाड्यात हजारो भाविकांना लाह्या, दही, दूध यापासून बनविलेल्या काल्याचा प्रसाद वाटण्यात आला.

Back to top button