विठुरायाचा ‘खजिना’ : जाणून घ्या देवाच्या खजिन्यामधील मौल्यवान दागिन्यांविषयी | पुढारी

विठुरायाचा 'खजिना' : जाणून घ्या देवाच्या खजिन्यामधील मौल्यवान दागिन्यांविषयी

सिद्धार्थ ढवळे

गरिबांचा देव मानलेल्या सावळ्या विठुरायाच्या खजिन्यात पुरातन असंख्य दागिने आहेत. या दाग-दागिन्यांनी आणि महागड्या पोशाखांनी श्री विठ्ठल- रुक्मिणीला सजविण्यात येते. रंगाने सावळा असलेला हा ‘पंढरीचा राणा’ हिरे- माणकांनी मढवलेल्या दागिन्यानी अधिकच सुंदर दिसतो.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणावर लीन होण्यासाठी जसे रंक येतात तसेच राव ही मोठ्या प्रमाणात दाटी करतात. या श्रीमंत भाविक भक्तांनी देवाला मौल्यवान असे दाग-दागिने अर्पण केले आहेत. त्यात मौल्यवान असा कौस्तुभ मणीही आहे. सुमारे दोनशे वर्षांपासूनचे असंख्य दागिने देवाच्या खजिन्यात आढळतात. श्री विठ्ठल मंदिर हे बडव्यांच्या ताब्यातून शासनाकडे आल्यावर देवाच्या खजिन्याची देखभाल राज्यशासनाच्या आधिपत्याखाली सुरू आहे. श्री विठुरायाचा हा खजिना हा इतर कोणत्याही मोठ्या देवस्थानापेक्षा नक्कीच कमी नसल्याचे हा खजिना पाहिल्यावर जाणवते. देवाच्या खजिन्यात ५० ते ६० मौल्यावान दागिने आहेत. यातील काही प्रमुख दागिन्यांच्या नोंदीचा काळ सापडत असला तरी अनेक दागिन्याचा काळ सोनारकाम करणाऱ्यांनाही कळत नाही. यातील प्रमुख दागिने असे.

  • लफ्फा : म्हणजे गळ्यातील हिरे-माणिक आणि पाचूचा हार. ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंदे यांनी हा दागिना श्री विठ्ठलाला अर्पण केला आहे. देवाच्या खजिन्यातील सर्वात अनमोल असा दागिना आहे.
  • मोत्याची बाजीराव कंठी : ही मोत्याची कंठी शेवटचे श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी देवाला अर्पण केली आहे. मधोमध हिऱ्याचे लोलक असलेला हा ४६ मोती असलेला अलंकार आहे.
  • मत्स्य : श्री विठ्ठलाच्या कानामध्ये रत्नजडीत असे मासे दिसतात. हा अलंकार कोणी देवाला अर्पण केला याची नोंद नाही. सोन्यात मडविलेले १४५ हिरे, ७९ माणिक, ५८८ पाचू या मत्स्यामध्ये लावलेले आहेत.
  • कंकण : या कंकणामध्ये ८० हिरे बसविले आहेत. कोल्हापूरच्या श्रीमंत सकरावाबाई राणी यांनी १८३२ मध्ये हे कंकण श्री विठ्ठलाला दान केले.
  • हिऱ्याची मोर मंडोळी : ही हिऱ्याची मोरे मंडोळी मनमोहक आहे. यात ३६ हिरे, १२ नीळ आहेत. श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी ही मोर मंडोळी देवाला अर्पण केली आहे.
  • कौस्तुभमणी : हा देवाच्या खजिन्यातील अत्यंत मौल्यावान दागिना आहे. यामध्ये १२ हिरे आणि मध्यभागी कौस्तुभ मणी लावलेला आहे.

श्री रुक्मिणीमातेचा खजिनाही भरगच्च :

श्री विठ्ठलाप्रमाणेच श्री रुक्मिणीचा खजिनादेखील असंख्य अनमोल दागिन्यानी सजला आहे. यातील अनेक दागिने १७व्या, १८ व्या शतकात भाविकांनी रुक्मिणी मातेला अर्पण केले आहेत. तर अनेक दागिने उत्पात समजाने बनवून रुक्मिणी मातेला अर्पण केले आहेत. रुक्मिणी मातेच्या खजिन्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली ६० मोहरांची माळ आहे. मोत्याचे लहान मोठे कंठे, हिरेजडित पाचूची गरसोळी, तानवड जोड, पाचपदरी हार, सोन्याचे चुडे, मोत्याच्या पाटल्या, हिरेजडित चंद्र-सूर्य असे अनेक दागिने ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडून श्री रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आले आहेत. तर सोन्याच्या घुंगराचे पैंजण हिरे जडीत बाजूबंद मोत्याचा कंठ, पानड्याचा बिंदी बिजवरा, हिरे जडीत पाटल्या आदी दागिने श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी अर्पण केले आहेत. बडोदे येथील भाऊसाहेब शिंदे यांनी अर्पण केलेले सोन्याचे तोडे ही पहायला मिळतात. चैत्रशुध्द प्रतिपदेपासून माघ वद्य द्वादशीपर्यंत सर्व सणावारांना श्री विठ्ठल व रुक्मिणी देवीला हे दागिने घालतात.

हेही वाचा 

Back to top button