सोलापूर : तोबराधारी शिक्षकांवर कारवाई होणार? | पुढारी

सोलापूर : तोबराधारी शिक्षकांवर कारवाई होणार?

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींना दशसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना दिली आहे. यामध्ये शाळेच्या परिसरात धूम्रपान न करण्याची सूचना केली आहे. मात्र जिल्ह्यातील काही शाळांचे गुरुजी तोंडात तोबरा धरत शाळा परिसरात येताना दिसतात. शिक्षकांच्या या वागण्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय दुष्परिणाम होतो, याचा विचार न केलेलाच बरा. अशा तोबराधारी गुरुजींवर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्वामी यांनी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही दशसूत्रीची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. यामध्ये शिक्षकांनी शाळा परिसरात धूम्रपान करू नये अशी सक्त ताकीद दिली आहे, मात्र जिल्ह्यातील काही शिक्षक शाळा परिसरात धूम्रपान करत असल्याचा आरोप होत आहे. धूम्रपानाच्या बाबतीत शासनाने कायदा केला आहे. शाळेच्या आवारापासून 200 मीटर अंतरावर कुठल्याही प्रकारचे धूम्रपान केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद त्यात आहे. असे असतानाही शाळेच्या परिसरातच गुरुजी धूम्रपान करतात. अशा गुरुजींवर शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

शिक्षक नेत्याच्या तोंडात कायम तोबरा

एका शिक्षक संघटनाचे राज्य पातळीवरील एक पदाधिकारी नेहमी मुख्यालयाच्या आवारात वावरताना दिसतात. पुढल्या वर्षी निवृत्त होणार्‍या या पदाधिकार्‍यांच्या तोंडात नेहमी तोबरा असल्याचे आढळून येते. इतकेच काय, ज्यावेळेस ते शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयात असतात, त्यावेळेसही त्यांच्या तोंडामध्ये तोबरा भरलेला असतो. अशा संघटनेच्या नेत्यांचा इतर शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा, हा प्रश्नच आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशीच गुरुजींचे मद्यपान

शाळेच्या पहिल्या दिवशीच एक गुरुजी मद्यपान करुन शाळेला आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द शिक्षणाधिकार्‍यांनीच या प्रकाराची माहिती दिली. या मद्यपी गुरुजीला ताब्यात घेण्यापूर्वीच ते फरारी झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असती, तर त्यांच्यावर कारवाई करता आली असती, अशी माहिती देण्यात आली आहे.

Back to top button