सोलापूर : कारंजे बंद, खेळण्या खराब, अस्वस्छतेमुळे दुर्गंधी | पुढारी

सोलापूर : कारंजे बंद, खेळण्या खराब, अस्वस्छतेमुळे दुर्गंधी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : भुईकोट किल्ल्याच्या बाजूला असलेले हुतात्मा उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे उद्यान म्हणून नावारूपाला आले होते. मात्र आता त्याची दुरवस्था झाली आहे. या बागेतील ठिकठिकाणचे कारंजे बंद असून कारंजातील पाणी दूषित झाल्याने मोठी दुर्गंधी पसरली आहे. बाथरूमचे दरवाजेही गंजलेले, मुलांसाठी असलेले खेळणी खराब झाल्या आहेत.

शहरातील इतर बागांच्या तुलनेत ही बाग यापूर्वी चांगल्या प्रकारे जपण्यात आली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी, बसण्यासाठी बाकडे, ट्रॅक, व विविध सुविधा असल्यामुळे याठिकाणी नागरिक, पर्यटक बच्चे कंपनीसह मोठी गर्दी करीत असतात. मात्र आता या उद्यानाची दुरवस्था होत आहे. या बागेत असलेले कारंजे बंद पडलेली आहेत विशेष म्हणजे त्यातील पाणी एकदम गढूळ झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटली आहे.

दुसरीकडे मुलांसाठी ठेवण्यात आलेली खेळणी काही चांगल्या अवस्थेत काही तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना इजाही होवू शकते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिक पाण्याचा बाटल्या बागेतच टाकत आहे. त्यामुळे अस्वच्छता दिसत आहे. स्वच्छतेसाठी लक्ष देण्याची गरज आहे. एकंदरीत, सर्वात चांगली, सौंदर्यात भर पाडणारी हुतात्मा बागेची दुरवस्था होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशीच आर्त हाक शहरातील पर्यटक देत आहेत.

स्वच्छतागृहाची झाली दुरवस्था

हुतात्मा उद्यानामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. विशेषत: कुटुंबीयांची मोठी गर्दी असते. याठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. खिडक्यांची काच निघाली आहे तर बाथरूमचे दरवाजे गंजलेले आहेत. बाथरूमचे पाणी बाहेर येत आहे. स्वच्छता नसल्यामुळे मोठी दुर्गंधी येत आहे.

Back to top button