सोलापूर : विजापूर रोड परिसरातील अतिक्रमण हटविले | पुढारी

सोलापूर : विजापूर रोड परिसरातील अतिक्रमण हटविले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : विजापूर रोडवरील इंचगिरी मठ ते छत्रपती संभाजी तलाव या रस्त्यावरील अतिक्रमण महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून आज हटविण्यात आले. सहा खोकी व एक पत्राशेड काढून टाकले आहे.

विजापूर रोडवरील चैतन्य मार्केट परिसर तसेच रस्त्याच्या कडेला फेरीवाले, खोकीधारक यासह विविध प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले होते. यामुळे या रस्त्यावर रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा येत असल्याच्या तक्रारी होत्या. महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानुसार महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ही बेधडक कारवाई केली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

इंचगिरी मठासमोर रस्त्यावर मासे विक्री करणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. याठिकाणी बांधण्यात आलेले अनधिकृत कट्टे आणि पत्राशेड अतिक्रमणविरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी काही राजकीय नेते तसेच विक्रेत्यांनीही विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधाला न जुमानता महापालिका कर्मचार्‍यांनी याठिकाणी कारवाई फत्ते केली. येथील कॅरेट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वेळोवेळी प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र, येथील अनधिकृत विक्रेत्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अखेर महापालिकेच्या या पथकाने ही मोठी मोहीम हाती घेतली. यादरम्यान सहा खोकी, एक पत्राशेड संपूर्णपणे निष्काषित करण्यात आले.

अतिक्रमण काढण्याचे आवाहन

भाजी विक्रेते, फेरीवाले अशा 20 जणांना अतिक्रमण न करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. महापालिकेने शहरात ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण स्वत:हून काढून घेऊन नुकसान टाळावे, असे आवाहान करण्यात आले आहे.

Back to top button