सोलापूर : फायनान्स वसुलीची धुरा गुंडांच्या हाती ! | पुढारी

सोलापूर : फायनान्स वसुलीची धुरा गुंडांच्या हाती !

सोलापूर : अंबादास पोळ : मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, अपुऱ्या पगारात घराचा गाडा चालवणे अवघड झाल्यांने अनेकांनी नातलगांकडे पैसे मागून प्रतिष्ठा घालवण्यापेक्षा एखाद्या बँक अथवा फायनान्सकडून गरजेपोटी कर्ज घेतले होते. परंतु, कोरोना काळात थकले हफ्ते भरून घेण्यासाठी चक्क तडीपार झालेल्या गुंडांकडून नामांकित फायनान्सची वसुली सुरु झाली आहे.

या वसुलदारांकडून कर्जदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, नातलग, मित्रांना च्या मोबाईल फोन नंबरवर बदनामी करण्याची धमकी देण्यापासून करण्यापासून ते थेट मारहाण करण्याचे प्रकार सुरु आहेत. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांच्या गुंडगिरीमुळे कर्जदार अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या लाटांमध्ये अनेक नागरिकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आली. जगण्याचे साधन हातातून गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांकडून पुन्हा एकदा नवी उभारी घेण्यासाठी अनेकांनी रिक्षा, टेंपो, कार अशा विविध प्रकारची वाहने फायनान्स कंपन्यांच्या झटपट मिळणार्‍या कर्जाच्या साहाय्याने वाहने घेत वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली.

परंतु, वाढत्या महागाईचा फटका पुन्हा एकदा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसू लागला आहे. एकीकडे उत्पन्न मिळण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे, त्यामुळे अनेकदा फायनान्स कंपन्यांचे एक-दोन हफ्ते थकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तर दुसरीकडे एक हफ्ता थकला तरीही फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजन्सीचे कर्मचारी कर्ज घेणार्‍यांशी अक्षरशः सराईत गुंडांसारखे वागत असल्याची सद्यःस्थिती आहे.

संबंधित फायनान्स कंपन्या, त्यांच्या वसुली एजन्सीच्या व्यक्तींकडून फोनद्वारे कर्ज घेणार्‍यांना उद्धटपणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच एजन्सीच्या 4-5 व्यक्ती संबंधित नागरिकास रस्त्यात अडवून हप्ते भरण्यासाठी दमदाटी, मारहाण करण्यापासून ते जीवघेणे हल्ले करण्यापर्यंतचे प्रकार करीत आहेत. यासंदर्भात नागरिक पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलिसांकडून त्यांनाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. त्यांची तक्रार घेण्याचीही तसदी पोलिस घेत नाहीत. याउलट ‘कर्ज तुम्ही घ्यायचे, हफ्ता तुम्ही थकवायचा आणि वाद घेऊन आमच्याकडे कसे येतात’ अशा शब्दात त्यांची बोळवण केली जात असल्याचे वास्तव आहे.

मनमानी कराभाराला चाप बसेल का ?…

रिक्षा, टेंपो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे कर्ज थकल्यानंतर त्यांना कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता थेट वाहने उचलून नेतात. रिक्षावर प्रवासी बॅज असते, त्या संबंधित रिक्षाचालकाच्या संमतीशिवाय कोणालाही विकता येत नाहीत. तरीही कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करून वाहनांची परस्पर विक्री केली जाते. एवढेच नव्हे, तर वाहने उचलून आणल्यानंतर टोईंगचे 3 हजार 850 रुपये, त्यावर जीएसटी, वाहन पार्किंग करण्याचे प्रत्येक दिवसाचे 80 रुपये अशा प्रकारे अक्षरशः लूट केली जात असल्याने अशा मनमानी कारभाराला चाप बसणार का,असा प्रश्‍न सर्व सामान्यांमधून विचारला जात आहे.

असे आहेत ‘आरबीआय’चे नियम…

वाहन कर्ज घेणार्‍यांशी कायदेशीर मार्गाने संपर्क साधावा. करारनामा पत्रे स्थानिक भाषेत असावेत. वाहन कर्ज घेणार्‍यांना जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही. – वाहन कर्ज घेणार्‍यांच्या घरी, कार्यालयात जाऊन बदनामी करू नये.

Back to top button