Solapur Lok Sabha Election 2024 सोलापुरात प्रतिष्ठेची लढत | पुढारी

Solapur Lok Sabha Election 2024 सोलापुरात प्रतिष्ठेची लढत

संजय पाठक

राज्यातील हायहोल्टेज लढतींपैकी एक असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाकडे सध्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. खर्‍या अर्थाने ही लढत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे.

राज्यातील सर्वात तप्त शहराकडे वाटचाल करणारे सोलापूर शहर सध्या मात्र राजकीय हायहोल्टेज लढतीमुळे राज्यभर चर्चेत आले आहे. वंचित बहुजन पक्षाचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतल्याने याठिकाणी आता खर्‍या अर्थाने महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होत आहे. त्यातही माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तथा सोलापूर शहर मध्यच्या आ. प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती माळशिरसचे आ. राम सातपुते यांच्यात लढत रंगली आहे.

दोन्ही उमेदवार तप्त उन्हातही प्रचारकार्यात गुंतले आहेत. त्यांचे बॅकबोन फोनाफोनी करून बेरजेचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. सुशीलकुमार शिंदे कन्येच्या विजयासाठी सकाळी सहा वाजल्यापासून कार्यमग्न होत आहेत. स्वतः शिंदे यांनी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे स्पष्ट होते. नाराजांना चुचकारत, कुणाला संभाव्य निवडणुकांविषयी आश्वासन देत सुशीलकुमार शिंदे हे प्रत्येकाला कन्या प्रणिती यांच्या बाजूने वळवून घेत आहेत.

राज्यभरात वंचित बहुजन पक्षाने कुठेही अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यांच्या पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचेही तसे कुणाला आदेश नाहीत. तरीही अगदी शेवटच्या क्षणी सोलापुरातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अनपेक्षितरीत्या अर्ज माघार घेतला. यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अर्थात यामागे बडा नेता असल्याची सोलापूरभर चर्चा आहे. त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे यांनी अगदी खुबीने एमआयएम पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी जुळवून घेत रमजान ईदच्या शिरखुर्म्यासोबत राजकीय डाव साधत त्यांच्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ती रोखण्यात यश मिळवले. या दोन डावपेचाच्या आधीही शिंदे यांनी माकपचे नेते, माजी आ. नरसय्या आडम यांच्याशी दिल्लीतील त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांशी आपल्या स्नेहपूर्ण संबंधांचा वापर करून त्यांनाही आपल्या बाजूला खेचून घेण्यात यश मिळवले.

दुसर्‍या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आ. राम सातपुते यांच्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व भाजप व महायुतीचे आमदार अगदी मनापासून झटू लागल्याचे चित्र आहे. यावरून ही निवडणूक खासदारकीसाठी कमी अन् विद्यमान आमदारांचीच जास्त झाल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एक म्हणजे सोलापूर शहर मध्य हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. उर्वरित सर्व म्हणजे शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ सोलापूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या पाचही विधानसभा मतदारसंघावर भाजप महायुतीची सत्ता आहे. यामाध्यमातून सर्व ठिकाणच्या आमदारांना भाजपने प्रचारास जुंपले आहे. त्यांच्या मतदारसंघातून भाजपच्या सातपुते यांना मिळणार्‍या मताधिक्क्यावरच आमदारकीचे तिकीट अवलंबून असल्याची प्रेमळ समज दिली असल्याची चर्चा आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे हे लोकसभेचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत त्यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून चांगले मताधिक्क्य मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय त्या मतदारसंघातील मातब्बर नेते, माजी आ. राजन पाटील यांना होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत नेमके उलटे चित्र आहे. माजी आ. राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असून हा पक्षा महायुतीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे यंदा त्याठिकाणाहून भाजपचे सातपुते यांना मताधिक्क्य मिळू शकते, अशी चर्चा आहे. आमदारांशिवाय पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख यांनाही भाजपने कामाला लावल्याचे चित्र आहे. यामुळे भाजपचा डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. त्याचबरोबर भाजपच्या हक्काच्या अशा हिंदुत्त्वादी संघटना, संघ परिवारातील प्रत्येक घटक उमेदवार सातपुते यांच्यासाठी कामाला लागाला आहे. सोशल मीडिया असो की प्रत्यक्ष प्रचार फेरी यामध्ये भाजपने जोरदार आघाडी घेत विरोधकांवर आघाडी घेतल्याचे सध्याचे चित्र आहे.

Back to top button