सोलापूर : चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा निर्घुण खून; सासू सासऱ्यासह नवरा अटकेत | पुढारी

सोलापूर : चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा निर्घुण खून; सासू सासऱ्यासह नवरा अटकेत

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यात चार महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या तरुणीचा निर्घुण खून केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी नवरा, सासू-सासरे यांना अटक करण्यात आली आहे.

करमाळा येथील कोमल सुभाष यादव या तरुणीचा माळशिरस येथील गणेश पांडुरंग गायकवाड या तरुणाशी २० ऑगस्ट २०२२ रोजी विवाह झाला होता. चारच महिन्यात सासू-सासरे व नवऱ्याने विवाहितेचा निर्घुण खून केल्याची घटना घडली. मयत कोमलची आई राणी सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर नवविवाहितेला सासू मनीषा व सासरा पांडुरंग व नवरा गणेश या तिघांनी मिळून नवविवाहितेला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

वारंवार किरकोळ कारणावरुन भांडण करुन नवरा गणेश हा तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. माहेरच्या लोकांकडून मला पंधरा हजार रुपये दे अशी मागणी देखील तो करत होता. १८ डिसेंबर रोजी पीडित विवाहिता कोमल हिला सासू-सासरा व नवरा गणेश यांनी बेदम मारहाण करून तिच्या गळा दाबून खून केला. दरम्यान हा खून उघडकीस येऊ नये म्हणून तिने गळफास घेतला असा बनाव देखील केला.

विवाहितेच्या माहेरच्यांना तुमची मुलगी सिरीयस असून तिला घेऊन जा असे फोन करुन सांगण्यात आले. मात्र आपल्या मुलीचा खून झाल्याचे समजल्यानंतर माहेरच्या मंडळींनी आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड, सासू मनीषा पांडुरंग गायकवाड, सासरा पांडुरंग गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खून करणे व मानसिक त्रास देणे व पुरावा नष्ट करणे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

हेही वाचा

Back to top button