सोलापूर विद्यापीठात आज १८ वा दीक्षांत समारंभ | पुढारी

सोलापूर विद्यापीठात आज १८ वा दीक्षांत समारंभ

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवार, 12 डिसेंबरला होणार आहे. त्याकरिता विद्यापीठ प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. या समारंभात आता कोणतीही विघ्ने येणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत असून तयारीवर विद्यापीठ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वतः बारकाईने लक्ष घातले आहे. कार्यक्रम नियोजन जबाबदारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

कोरोना पार्श्वभूमीनंतर पहिल्यांदाच सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. वर्षभरापासून विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाची प्रतीक्षा होती. अनेक विद्यार्थी विदेशात उच्चशिक्षण व नोकरीनिमित्त गेले आहेत. त्यांना निर्धारित मुदतीत पदवी सादर करणे अनिवार्य असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे करिअर व शिक्षण धोक्यात येऊ नये यासाठी विद्यापीठाने परीक्षेचा निकाल लागताच अवघ्या काही दिवसात तातडीने दीक्षांत समारंभ आयोजित केला आहे. यंदा सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या दीक्षांत समारंभासाठी शंभर बाय दीडशे चा भला मोठा मंडप उभारला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत गेट उभारण्यात आले आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना चौकशी कक्ष उभारण्यात आले आहे. विद्यापीठ परिसर स्वच्छ व सुंदर बनवण्यात आला आहे. प्रवेशद्वारापासून मुख्य सभा मंडपापर्यंत विविध रंगाची सुबक रांगोळी काढली आहे. वाहनांची पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, साऊंड, लाईट, पंखे, सुरक्षा रक्षक अशा विविध प्रकारच्या व्यवस्था करण्यात आली आहे.

दीक्षांत समारंभात बाराबंदी पोशाख…

गेल्या अनेक वर्षांपासून पदवी प्रदान केल्यानंतर काळ्या रंगाचा गाऊन व काळी टोपी देऊन गौरविण्यात येत होते, परंतु मागील तीन वर्षार्ंपासून सोलापूर विद्यापीठाने प्रामुख्याने सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील नंदीध्वज मानकरी ज्या पद्धतीने बाराबंदीचा पोशाख परिधान करतात. त्याच पद्धतीने शिक्षणात उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करणार्‍या मानकरांचा सन्मान पारंपारिक पोशाखात व्हावा यासाठी बाराबंदी पोशाखाची रचना अंमलात आणली.

Back to top button