सोलापूर : महामार्गाच्या कडेला धोकादायक गटार! | पुढारी

सोलापूर : महामार्गाच्या कडेला धोकादायक गटार!

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर चौपदरीकरण करण्याचे काम भारतमाला योजनेमधून करण्यात येत आहे. या रस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच साईडला असलेल्या गटारी धोक्याचे इशारा देत आहेत. यावरील झाकण तुटून पडल्याने प्रवासासाठी हा परिसर धोक्याचा ठरला आहे. अशा या धोकादायक प्रकारामुळे वाहनांच्या वेगाला अडथळ्याने ब्रेक लागत आहे.

सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. या महामार्गावर गांधीनगर येथील वीरतपस्वी मठापासून मल्लिकार्जुन नगर, विडी घरकुल, कुंभारी, तोगराळी, लिंबीचिंचोळी, वळसंग, कर्जाळ, कोन्हाळ्ळी, अक्कलकोट बायपास अशा दहा ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या परिसरात वाड्यावस्त्या असलेल्या ठिकाणी सर्व्हिस रोडही करण्यात आले आहेत. या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी गटारी बांधण्यात आल्या आहेत. सध्या बहुतांश ठिकाणी असलेल्या गटारीवरील झाकण तुटून आत पडले आहेत. शिवाय या गटारीत पावसाचे पाणी जाऊन पूर्णपणे माती, दगडाने भरल्या आहेत. यामुळे पाणी वाहून मोकळ्या आणि सकल भागात जात आहेत.  कित्येक ठिकाणचे पाणी रहिवासी वस्त्यांमध्ये जात असल्याने नागरिकांना या पाण्याचा त्रास होत आहे.

बांधकाम करताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने तकलादू गटार, रस्ते, उड्डाणपूल न बांधता टिकाऊ काम करण्याची अपेक्षा वाहनधारकांसह नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगर परिसरात असलेल्या बादशहा गॅस पंपासमोर उड्डाणपुलाजवळ गटारीचे झाकण तुटून पडल्याने या भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय इस्कॉन टेम्पलकडे जातानाचा रस्ता, कुंभारी येथील टोल नाका परिसर ते कुंभारी बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला झाकण धोकादायक बनले आहेत. तोगराळी, वळसंग, करजाळ, कोन्हाळ्ळी येथील सर्व्हिस रोड परिसरातील गटारीवरील झाकणही धोकादायक अवस्थेत आहेत. याशिवाय उड्डाणपुलाच्या साईडला करण्यात आलेला कोबाही निकृष्ट दर्जाचा असल्याने त्यातून मुरुम, माती रस्त्यावर येत आहे. याचा परिणाम होत रस्ता चिखलमय बनत असल्याने गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

धोकादायक गटारीमुळे लहान बालकांसह प्राण्यांना धोक्याचे इशारे मिळत आहेत. असे धोकादायक काम त्वरित थांबून चांगल्या पद्धतीने काम व्हावे. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– बाबुराव चितली,
रहिवाशी

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत आहे. यात काही दोषही आहेत. किरकोळ दोषामुळे सगळेच कामे कलंकित होऊ नये यासाठी किरकोळ दुरुस्त्या, अडचणी सोडवून नागरिकांना सहकार्य करावे.
– ऋषिकेश उपासे,
व्यावसायिक, सोलापूर

Back to top button