बियाणे स्वस्त तरीही विक्री 20 टनांनी घटली | पुढारी

बियाणे स्वस्त तरीही विक्री 20 टनांनी घटली

सोलापूर ः संतोष सिरसट : जिल्ह्यात खरीप व लेट खरीप हंगामामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याच्या बियाण्यांच्या किमती सरासरी एक हजार रुपये प्रती किलोने कमी झाल्या आहेत. दर कमी होऊनही यंदाच्या वर्षी कांदा बियाण्यांची विक्री जवळपास 20 टनांनी कमी झाली. कांदा बियाण्यांचे भाव कमी झाल्याने त्याची खरेदी करताना शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी कांद्याला चांगले भाव नव्हते. याशिवाय बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी कांद्याच्या बियाण्यांच्या दरामध्ये घट झाली आहे. मागील वर्षी कांद्याला चांगले दर नसल्यामुळे यावर्षी कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी ओळखली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी यंदाच्या वर्षी कांदा बियाण्यांच्या किमती नियंत्रणात ठेवल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप व लेट खरीप या दोन हंगामामध्ये कांदा लागवड केली जाते. ही लागवड जवळपास सरासरी 13 ते 16 हजार हेक्टर क्षेत्रावर होत असते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही कांद्याच्या विक्रीसाठी राज्यातसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही प्रसिद्ध आहे. शेजारील राज्यातून कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीत येतो. जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ही बाजार समिती हक्काची झाली आहे. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत याठिकाणी कांद्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातही हळूहळू कांद्याचे क्षेत्र वाढू लागले आहे.

कांदा हे नगदी पीक आहे. कधी कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणतो, तर कधी तो ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याच्या भावावरून मोठ्या प्रमाणात राजकारण केले जाते. अनेकदा कांद्याच्या भाववाढीमुळे सरकारही पडले आहे. त्यामुळे कांद्याचा भाव हा संवेदनशील मानला जातो. यंदा त्याच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

शेतकर्‍यांचे वाचले 20 कोटी
कांदा बियाण्यांच्या किंमती यंदा कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जवळपास 20 कोटी रुपयांची बचत झाली आहे. यंदाच्या वर्षी 20 टन बियाण्यांची विक्री झाल्याचे गृहीत धरल्यास प्रत्येक किलोमागे एक हजार रुपयांची बचत झाली आहे. म्हणजेच ही बचत जवळपास 20 कोटींवर गेली आहे.

मागील वर्षी 40 टनांची विक्री
कांदा बियाण्यांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 20 टनांनी घटली आहे. मागील वर्षी नामांकित कंपन्यांचे जवळपास 40 टन कांदा बियाणे विक्री झाले होते. यंदाच्या वर्षी ही विक्री 20 ते 25 टनांवरच थांबली आहे.
बियाण्यांच्या भावाची तुलनात्मक स्थिती
मागील वर्षाचे किलोचे भाव- 2700 रुपये
यंदाच्या वर्षाचे किलोचे भाव- 1800 रुपये

 

कांद्याची लागवड जिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळा हंगामामध्ये होते. किती बियाण्यांची विक्री झाली आहे, याची माहिती घेणे सुरू आहे.
– विवेक कुंभार,
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

कांद्यासाठीची मोठी बाजारपेठ सोलापुरात आहे. त्यामुळे लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. पण यंदा बियाणे स्वस्त होऊनही म्हणावी तशी लागवड होणार नाही. सोयाबीनची लागवड वाढली आहे.
प्रशांत भोसले,
कांदा उत्पादक शेतकरी

यंदाच्या वर्षी शेतकर्‍यांचा कल सोयाबीन पिकाकडे आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा बियाण्यांची विक्री कमी झाली आहे. बियाण्यांचे भाव कमी होऊनही विक्री कमी झाली आहे. यावरून शेतकर्‍यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे स्पष्ट होते.
– ब्रह्मानंद ढेकळे, मालक,
ढेकळे एंटरप्रायजेस.

Back to top button