मंगळवेढा : दामाजी कारखान्याच्या परिवर्तनाचे शिलेदार | पुढारी

मंगळवेढा : दामाजी कारखान्याच्या परिवर्तनाचे शिलेदार

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा :  मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन घडवले आणि विद्यमान आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला नाकारले. नंदकुमार पवार, रामकृष्ण नागणे, अजित जगताप, शिवाजी काळुंगे, दामोदर देशमुख हे परिवर्तनाचे शिलेदार ठरलेे. या निवडणुकीतही नेहमीप्रमाणे राजकीय बदल दिसून आले.

शहराच्या राजकारणात आ. आवताडे यांच्या विविध संस्थांच्या माध्यमातून असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांचे शहर होमपिच म्हणून लौकिक होता. मात्र, त्याला छेद देण्याची भूमिका अजित जगताप यांनी स्वीकारून त्यात ते यशस्वी ठरले आहेत. साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक आक्रमकपणे प्रचाराची धुरा जिल्हा नियोजन सदस्य अजित जगताप यांनी सांभाळली. त्यांनी विद्यमान आ. समाधान आवताडे यांना थेट आव्हान देत ग्रामीण भागामध्ये सभांमधून जोरदार टीकास्त्र सोडले होते.
याशिवाय शहरामध्ये असणार्‍या अडीच हजार सभासदांतल्या जवळपास प्रत्येक सभासदांच्या गाठीभेटी घेऊन तसेच फोनवरून संपर्क साधत सत्तांतर करणे किती आवश्यक आहे, ही भूमिका पटवून देत आपले संपूर्ण राजकीय कसब पणाला लावत आवताडे यांच्या होमपिचला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.

बळीराजा परिवाराचे प्रमुख दामोदर देशमुख यांनी दोन वर्षांपासून दामाजी कारखान्याच्या निवडणुकीबद्दल बैठका घेत सभासदांमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जागृती निर्माण करण्याची भूमिका घेत स्वतःचा पॅनल उभे करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. तेव्हा एकसंधपणे विरोध केला तरच अवताडे यांची सत्ता जाऊ शकते, ही भूमिका त्यांना तालुक्यातील नेते मंडळींनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावून प्रचार सुरू केला.

संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन नंदकुमार पवार हे अवताडेविरोधी चळवळीतील प्रमुख केंद्र होते. त्यांनी सातत्याने सभासद व तालुक्याच्या विविध भागांतील राजकीय पदाधिकार्‍यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची आवश्यकता पटवून देत तालुक्यामध्ये सभासदांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण केला.

जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक भागात अर्थकारण करणार्‍या व दामाजी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन असलेल्या रामकृष्ण नागणे यांनीदेखील पडद्यामागे बर्‍याच हालचाली केल्या. परिचारक गट व भालके गटाने एकत्रित राहून निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक भागातील उमेदवार्‍या निश्‍चित केले.तसेच परिचारक यांना समविचारी आघाडी निर्माण करण्यात विश्‍वास देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून काम केले आहे. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन असलेले शिवाजीराव काळुंगे हे सध्या सीताराम महाराज साखर कारखान्याच्या माध्यमातून सक्रिय आहेत.
असे असले तरी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे धनश्री परिवाराच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा राबवत समविचारी आघाडीला कारखाना चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याबाबत ठाम भूमिका घेतली.

Back to top button