सोलापूर : सरकारने माफ केला तरी आमचा टोल द्यावाच लागेल | पुढारी

सोलापूर : सरकारने माफ केला तरी आमचा टोल द्यावाच लागेल

सोलापूर;   पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने वारकर्‍यांच्या वाहनांना आषाढी वारीमध्ये टोल माफी दिली आहे. त्यामुळे या वाहनांची टोलमधून मुक्तता झाली आहे. मात्र बार्शी तालुक्यातील रस्त्यांवर पंढरपूरवरुन येणारी वारकर्‍यांची वाहने अडवून तृतीयपंथीयांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करत आहेत. तालुक्यातील पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

तृतीयपंथीयांमुळे वारकर्‍यांना या आर्थिक लुटीस सामोरे जावे लागत आहे. बार्शी तालुक्याला जोडणार्‍या महत्त्वाच्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून तृतीयपंथीयांनी उच्छाद मांडला आहे. दोन-तीनच्या गटाने रस्त्यावर मध्यभागी थांबून ते येणारे प्रत्येक खासगी वाहन अडवत आहेत. वाहनचालकांनी पैसे दिल्याशिवाय ते त्यांचा रस्ता मोकळा करत नाहीत. एखाद्या चालकाने पैसे देण्यास टाळाटाळ केली की अचकट-विचकट बोलून, शिव्याशाप देऊन ते त्याचा पाणउतारा करत आहेत. त्यांच्या अवताराला आणि अंगविक्षेपाला घाबरून चालक मुकाट्याने खिशातून पैसे काढत आहेत. त्यामुळे त्यांचे फावत आहे.  अनेक महिन्यांपासून ही वसुली सुरू आहे. याबाबत अनेकांनी स्थानिक पोलिस अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ते त्यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे तृतीयपंथीयांना रान मोकळे मिळाले आहे.

याचा त्रास वाहतुकीला होत आहे. या तृतीयपंथीयांमुळे अपघाताचाही धोकाही संभवत आहे. काही वेळा तृतीयपंथीय आणि वाहनचालकांमधील वादामुळे वाहतूक खोळांबत आहे. या लुटीतून दुचाकीचालकांचीही सुटका होत नाही. त्यांना चुकवून वाहन नेऊ पाहणार्‍या चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातून किरकोळ अपघातही झाले आहेत.

सध्या वारी माघारी फिरली आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांची रेलचेल आहे. शासनाने टोल माफी केल्यामुळे वारकरी खूश असले तरी बार्शी तालुक्यात मात्र ही जबरदस्तीची टोल वसुली त्यांच्या आनंदावर विरजण घालत आहे. स्थानिक पोलिस त्यावर कारवाई करत नसल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

Back to top button