सोलापूर : 29 मस्जिद, 7 मंदिरांना भोंगा परवाना | पुढारी

सोलापूर : 29 मस्जिद, 7 मंदिरांना भोंगा परवाना

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या आवाजाच्या वाद्यांना बंदी आहे. यावर मनसेचे राज ठाकरे यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर सर्वच मस्जिद व मंदिरांवर बसविण्याच्या भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागली. त्यानुसार कागदपत्रे पाहून पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील 29 मस्जिद व 7 मंदिरांना भोंगा बसविण्याचा परवाना देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अंतर्गत ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 (1) ते 4 (1) नियमानुसार ध्वनीची पातळी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात स्पिकरचा आवाज दिवसा 75 डेसिबल, तर रात्री 70 डेसिबल असणे बंधनकारक आहे. व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल, तर रात्री 55 डेसिबल असणे बंधनकार आहे, तसेच निवासी क्षेत्रात 55 डेसिबल व रात्री 45 डेसिबल आवाज बंधनकारक आहे. शांतता झोन असलेल्या ठिकाणी दिवसा 50, तर रात्री 40 डेसिबलपर्यंत आवाज असावा, असेही पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या परवानगीत म्हटले आहे.

पहाटे 6 पूर्वी मोठ्या आवाजात कोणतेही वाद्य वाजविता येणार नाही, अशाही सूचना केलेल्या आहेत व फटाके वाजविण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.

ईदनिमित्त सूचना
1) गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक व कुर्बानी देऊ नये. 2) खासगी व्यक्ती किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परस्पर जनावरांची वाहने अडवू नयेत. 3) बकरी ईदच्या अनुषंगाने कुर्बानी ही नागरिकांनी प्रतिकात्मक स्वरूपात द्यावी. 4) कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर रक्त, मांस पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. 5) चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ती पोस्ट टाकणार्‍याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. 6) बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आहेत. त्यामुळे जातीय सलोखा राखावा.

Back to top button