सोलापूर : हरणाची शिकार केल्याची खोटी माहिती देणार्‍यास अटक | पुढारी

सोलापूर : हरणाची शिकार केल्याची खोटी माहिती देणार्‍यास अटक

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  दारूच्या नशेत कोंडी येथे 3 ते 4 जणांनी हरणाची शिकार केली आहे, अशी खोटी खबर देण्यार्‍या श्रीराम उर्फ सोमनाथ मनोहर भोसले (वय 34, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, रात्री 11 वाजता सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या डायल 112 वर सोमनाथ भोसले याने फोन करून सांगितले की, कोंडी येथे 3 ते 4 जणांनी हरणाची शिकार केली आहे, हरणाला पकडले आहे. तेव्हा पोलिस नाईक फिरोज मियाँवाले व रहीम सय्यद हे दोघे कोंडी गावात पोहोचले. त्यानंतर कॉल करणार्‍या सोमनाथ भोसले याच्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन करुनसुध्दा तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर सोमनाथ भोसले याला पोलिसांनी शोधून त्याची चौकशी केली असता सोमनाथ हा दारूच्या नशेत आढळला. त्याला घटना कुठे घडली ती जागा दाखव असे विचारले असता सोमनाथ याचे बोलणे अस्पष्ट होते. पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला शासकीय रुग्णालयात नेले व त्याची वैद्यकीय तपासणी केली. सोमनाथ हा दारूच्या नशेत असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना मिळाले.

त्यामुळे पोलिसांनी सोमनाथ भोसले याला पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.

Back to top button