पोलिस भरती : युवकांचा आणखी जोमाने सराव सुरू | पुढारी

पोलिस भरती : युवकांचा आणखी जोमाने सराव सुरू

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा :  गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलिस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाल्याने पोलिस भरतीसाठी मैदानात घाम गाळत असलेल्या युवक – युवतींमधून समाधान व्यक्‍त होत आहे. मैदानात आणखी जोमाने सराव सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता.तारखा पुढे ढकलण्यात आल्याने पोलिस होण्याचे स्वप्न पाहू इच्छिणार्‍या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य निर्माण झाले होते. वयोमर्यादा ओलांडून जात असल्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाली होती. नुकतीच महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची 7231 पोलिस शिपाई रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती मागील वर्षी गृह विभागाकडून देण्यात आली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करण्यात आली. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा पास झालेल्याच उमेदवारांना मैदानी परीक्षा देता येणार, अशा प्रकारचे बदल करण्यात आले होते. यंदा मात्र पूर्वीप्रमाणेच सुरुवातीला मैदानी व नंतर लेखी परीक्षा घेणार असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

सरकारने भरती प्रक्रियेमध्ये पूर्वीप्रमाणे आधी मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा या निर्णयाचे स्वागत करतो. शारीरिक दृष्ट्या सदृढ असलेल्या उमेदवारांना याचा नक्कीच लाभ होईल.
– पिंटू पवार, स्वराज प्रतिष्ठान

Back to top button