सोलापूर : झेडपीच्या 28 पाझर तलावांचे हस्तांतरण | पुढारी

सोलापूर : झेडपीच्या 28 पाझर तलावांचे हस्तांतरण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषद जलसंधारण विभागाकडे असलेले 28 तलाव राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे हस्तातंरण करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी घेण्यात आला. या तलावांचे रुपांतर साठवण तलावात होणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेण्यात आला. राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर हस्तातंरण करण्यात आलेल्या तलावांचे रुपांतर साठवण तलावात करण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदेचे कोणतेचे नुकसान नाही. यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तलावांचे मालकी हक्‍क जिल्हा परिषदेकडेच असणार असल्याचीही भूमिका प्रशासक स्वामी यांनी घेतली आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर उपक्रमातून जिल्ह्यातील 75 तलावांच्या दुरुस्तीचे व क्षमता वाढविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने 15 ऑगस्ट रोजी या तलावाच्या परिसरात ध्वजारोहण करण्याचाही निर्णय यावेळी सभेत घेण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला सभेचे सचिव तथा जि.प.प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी विषयपत्रिकेची वाचन केले. यास सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकार्‍यांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांच्यासह जि. प. खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेचा निधी 31 मार्चपर्यंत खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील काळात 31 मार्च रोजीच अंतिम ताळेबंद करण्यात येणार आहे. निधी खर्चासाठी मुदतवाढ न देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

डीबीटी योजनेसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

जिल्हा परिषद सेस फंडातून घेण्यात येणार्‍या योजनांतील मागील वर्षातील निधी अखर्चित राहिला आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया करण्यास विलंब झाल्याने निधी वेळेत खर्च झाला नाही. त्यामुळे डीबीटी योजनेतील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव जि.प.सभेत घेण्यात आला.

Back to top button