एनटीपीसीचे सामाजिक योगदान उल्लेखनीय : जिल्हाधिकारी | पुढारी

एनटीपीसीचे सामाजिक योगदान उल्लेखनीय : जिल्हाधिकारी

दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  एनटीपीसीचे जिल्हा प्रशासनाला नेहमीच सहकार्य असते. एनटीपीसीकडून ऊर्जा निर्मिती बरोबरच बालिका सशक्तीकरणाच्या माध्यमातून सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

बालिका सबलीकरण अभियानाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षिका तेजस्वी सातपुते, एनटीपीसीचे पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक मुनिष जौहरी, सखी महिला मंचच्या अध्यक्षा मृदुला जौहरी, औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे सीजीएम एन. एस. राव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, एच आर मॅनेजर के.एस.मूर्ती, राजीव आकोटकर, के व्यंकटय्या आदी उपस्थित होते.

बालिका सबलीकरण अभियानाच्या माध्यमातून मुलींचा सर्वांगीण विकास होऊन त्या भविष्यात देशाच्या जडणघडणीत आपला निश्चितच योगदान देतील असा विश्वास जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पोलीस अधीक्षिक सातपुते म्हणाल्या की, विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एनटीपीसीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. समाजाचा रथ जर चांगला चालायचा असेल तर स्त्री पुरुष ही दोन्ही चाके समान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमास सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट आर के शर्मा, सृजना महिला समितीच्या अध्यक्षा विजया राव,डीजीएम कविता गोयल, एच आर सिनिअर मॅनेजर पीएम अंबिली, साईराज क्षिरसागर, एनटीपीसी आणि सीआयएसएफचे कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button