सोलापूर : ‘ त्या’ आरोपीस साडी-चोळी देण्याचा प्रयत्न | पुढारी

सोलापूर : ‘ त्या’ आरोपीस साडी-चोळी देण्याचा प्रयत्न

सोलापूर/ बार्शी : पुढारी वृत्तसेवा:  महिलादिनी सोशल मीडियावर महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बार्शी येथील पोलिस ठाण्यात बार्शीचे तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन अरगडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी बार्शीत आणलेल्या संशयित आरोपीस महिलांसह तृतीयपंथीयांनी बांगडी व साडीचोळीचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली.

जीवन अरगडे यांनी 8 मार्च रोजी महिलादिनी महिलांसंदर्भात बदनामीकारक मेसेज सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमांन्वये तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर महिलांनी मुंबई येथे जाऊन महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती. तेथेही अरगडे यांनी महिलांना अपशब्द वापरले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांत पुन्हा अरगडे याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासकामी अरगडे यास बार्शीत आणले होते. बार्शी येथून सोलापूर येथील दिव्यांग न्यायालयात त्याला सरकारी गाडीतून नेले जात होते.

दरम्यान, ही माहिती महिलांना समजतात त्यांनी शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून अरगडे यास घेऊन जाणार्‍या सरकारी पोलिस गाडीसमोर उभे राहून साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यासमोर यावेळी मोठी गर्दी झाली होती.

Back to top button