सोलापूर : पुणे-लातूर महामार्ग 6 वर्षांपासून प्रतीक्षेत | पुढारी

सोलापूर : पुणे-लातूर महामार्ग 6 वर्षांपासून प्रतीक्षेत

सोलापूर / बार्शी : गणेश गोडसे :  पुणे-लातूर हा सहा वर्षांपूर्वी असलेला राज्य महामार्ग आता सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. यास सहा वर्षांपूर्वी राज्य महामार्गावरुन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे.
सातारा-अकलूज-टेंभुणी-बार्शी-येडशी-लातूर अशा नवीन राष्ट्रीय महामार्गात त्याचे रूपांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली होती. मात्र, या महामार्गाचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हा महामार्ग सुरू होणार का नाही, याबाबत संभ्रमावस्था असून हा रस्ता चौपदरीकरण होणार असल्यामुळे रस्त्यालगची दुकाने, घरे, शेती रूंदीकरणात जाणार या भीतीने अनेकजण चिंतीत आहेत.

पूर्वी पुणे-लातूर राज्यमार्ग असलेल्या व गत सहा वर्षांपूर्वी सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून उदयाला आलेल्या या रस्त्यास सहा वर्षांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला होता. सातारा-अकलूज-टेंभुणी-बार्शी-येडशी-लातूर अशा नवीन राष्ट्रीय महामार्गात त्याचे रूपांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली होती. त्यामुळे तत्कालीन राज्य शासनाच्या घोषणेनुसार टेंभुर्णी-येडशी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे काय होणार, काम सुरू होणार का थांबवले जाणार आदी प्रश्न उपस्थित होत होते.

अगोदरच रस्ता चौपदरीकरणामुळे आपली दुकाने, घरे, जागा, शेती रुंदीकरणात जाणार या चिंतेत असणार्‍या या राज्यमार्गावरील जनतेला हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. जिल्हामार्ग, आंतर जिल्हामार्ग, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांच्या अंतराच्या मर्यादा वेगवेगळ्या असल्यामुळे आता आपले काही शिल्लक राहणार का, आपण बेकार होणार का आदी विविध विषयांनी चिंताग्रस्त नागरिक झाले आहेत. राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यामुळे या मार्गाची दैना फिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मार्ग केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली जाणार असल्यामुळे या मार्गास निधीची कमतरता भासणार नसल्याचे अधिकार्‍यांकडून समजते. मात्र नारळ कधी फुटणार याबाबत मात्र अजूनही शांशकता आहे. टेंभुर्णी-येडशी-लातूर राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाल्यामुळे हा रस्ते रुंदीकरणाचा उपक्रम आहे तसा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाण्याची शक्यता जाणकारांमधून वर्तवली जात आहे.

रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यावरच खर्‍याअर्थाने चौपदरीकरणाच्या कामास गती आली, असे म्हणता येईल. राष्ट्रीय महामार्गाचे मुख्यालय मराठवाड्यात झाल्यामुळे उप-कार्यालय कुर्डूवाडी अथवा बार्शी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बार्शीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षेतील टेंभुर्णी-लातूर व पंढरपूर-करमाळा या दोन मार्गांची हद्द राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होणार होती. त्यानुसार बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारितील कुसळंब ते येरमाळा (ता. कळंब) हद्दीतील राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाने आपल्या ताब्यात घेतला आहे. तेथे कामही गतीने सुरू आहे.

या मार्गास राज्यमार्गावरून राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाल्याने या मार्गावरील जमिनी, गुंठेवारी आदींमध्ये भरीव वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या टेंभुर्णी-लातूर या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाच्या प्रक्रियेस केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच सुरुवात होईल का, याकडे टेंभुर्णी-लातूरदरम्यानच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अद्याप हा मार्ग राज्य शासनाकडेच?

केंद्र सरकारने पुणे-लातूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करुन सहा वर्षे लोटली. अद्याप हा रस्ता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याचे समजते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अजून मागणी केली नाही. त्यामुळे सध्या तरी चौपदरीकरणाचा मार्ग अधांतरीतच असल्याचे सिद्ध होत आहे.

Back to top button