सेालापूर : जिल्हा, महिला रुग्णालयासाठी वाढीव निधी | पुढारी

सेालापूर : जिल्हा, महिला रुग्णालयासाठी वाढीव निधी

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जवळपास 38 कोटी 31 लाख रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वतंत्र 100 बेडचे जिल्हा रुग्णालय आणि 100 बेडचे महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे काम आता मार्गी लागणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली आहे.

सध्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलवर मोठा ताण असून शहर व जिल्ह्यातील अनेक रुग्ण त्या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी असणारी यंत्रणा अपुरे पडते. अनेकवेळा रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेण्याची वेळ येते. याचा विचार करून ग्रामीण भागांतील रुग्णांसाठी स्वतंत्र 100 बेडचे हॉस्पिटल उभे करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता.

त्याबरोबरच 100 बेडचे महिला हॉस्पिटलही उभे करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यासाठीचे काम गुरुनानक चौकातील शासकीय जागेवर सुरु आहे. मात्र, या बांधकामासाठी 5 नोव्हेंबर 2016 साली मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे 20 कोटी 33 लाख 90 हजार रुपयांच्या खर्चाला परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर सातत्याने बांधकामाच्या विविध साहित्यांच्या किंमतीत वाढ होत गेली.

त्यामुळे मूळ तरतूद असलेल्या रकमेत हे हॉस्पिटल उभे करण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या बांधकामासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी 38 कोटी 31 लाख 17 हजार 384 रुपयांच्या खर्चाला नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये मुख्य इमारत, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, पोस्टमार्टेम रुम, गटार, विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण, जल पुनर्भरण, अग्निशमन यंत्रणा उभी करण्याची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मूळ किंमतीत आता जवळपास 17 कोटी रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे या इमारतींच्या कामांना आता खर्‍या अर्थाने गती येणार आहे. या दोन्ही इमारती वेळेत उभ्या राहिल्यास सिव्हिल हॉस्पिटलवरील रुग्णांचा ताण निश्चितपणे कमी होणार आहे.

बांधकामाचे दर वाढल्याने बांधकाम विभागाच्यावतीने वाढीव निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याला मंजुरी मिळाली आहे.
– डॉ. प्रदीप ढेले,
जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

Back to top button