सोलापूर :  एनटीपीसीच्या थकीत कराबाबत उद्या निर्णय | पुढारी

सोलापूर :  एनटीपीसीच्या थकीत कराबाबत उद्या निर्णय

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील एनटीपीसी कंपनीच्या करासंदर्भात गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कंपनीने जिल्हा परिषदेकडे अपील दाखल केले आहे. यावर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजू जाणून घेण्यात आल्या. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद जाणून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बुधवारी 9 मार्चच्या स्थायी समितीच्या सभेत यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थायी समितीने दिलेला आदेश एनटीपीसीला मान्य नसल्यास त्यांना थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करावे लागणार आहे. आहेरवाडी, फताटेवाडी, तिल्हेहाळ व होटगी स्टेशन या ग्रामपंचायतीकडून सुमारे 54 कोटींच्या कराची मागणी एनटीपीसीकडे करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार कर भरण्यात यावा, असे आदेश गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी यापुर्वीच दिला आहे.

गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुध्द एनटीपीसी कंपनीने जिल्हा परिषदेकडे अपील केल्याने अध्यक्ष कांबळे यांच्या दालनात याबाबत गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी कंपनीच्या वतीने लेखी म्हणणे सादर करण्यात आले. तर चार ग्रामपंचायतींनाही त्यांचे म्हणणे लेखी सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. त्यानुसार या चार ग्रामपंचायतीकडून लेखी म्हणणे अध्यक्षांकडे पुन्हा सादर करण्यात सोमवार पर्यंत मुदत देण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायतीकडूनही लेखी भूमिका दाखल करण्यात आली आहे. आता काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीची आकारणी अमान्य

ग्रामपंचायतीकडून आकारण्यात आलेली आकारणी एनटीपीसी कंपनीकडून अमान्य करण्यात आली आहे. तर, चार ग्रामपंचायती आपल्या करआकारणीवर ठाम राहिल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे. एनटीपीसी थकीत कराबाबत ग्रामपंचायतीला वेटिंगवर ठेवत असल्याने शंका उपस्थित होत आहे.

Back to top button