कराड-विटा रस्त्यावर सुर्ली घाटात एसटीवर दगडफेक | पुढारी

कराड-विटा रस्त्यावर सुर्ली घाटात एसटीवर दगडफेक

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराड-विटा रस्त्यावरील कराडपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्ली घाटात अज्ञाताने एसटीवर दगडफेक केली. मंगळवार दिनांक ३० रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून एसटीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी आगारातून सुटणारी आटपाडी-कराड एसटी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कराड जवळील सुर्ली घाटात आली. यावेळी घाटातील वरून दुसरे वळण पार करून एसटी पुढे जात असताना अचानकपणे अज्ञातांनी पाठीमागून एसटीवर दगडफेक केले. यामध्ये एसटीच्या पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या. ही बाब लक्षात येताच चालकाने एसटी रस्त्याच्या बाजूला घेऊन उभा केली. तोपर्यंत दगडफेक करणारे घटनास्थळावरून पसार झाले होते.

त्यामुळे नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली हे समजू शकले नाही. दगडफेकीनंतर एसटीत असणारे सर्व २१ प्रवासी सुरक्षित आहेत का? याबाबत चालक व वाहक यांनी खात्री करून प्रवाशांची विचारपूस केली. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी एसटी कराड आगारात आणली. त्यानंतर चालक वाहक यांनी एसटी तालुका पोलिस ठाण्यात आणली. येथे पोलिसांनी घडल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली याबाबत विचारणा केली असता ते सांगता येत नसल्याचे चालक-वाहक आणि पोलिसांना सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होते.

Back to top button